केवळ एका गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून वर्षभरात एका कुटुंबाला चांगला नफा मिळू शकतो आणि यासोबतच शेतीचे उत्पन्नही वाढू शकते हे सिद्ध करून दाखवलंय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लांडेवाडी येथील सुनंदा चासकर यांनी. केवळ एक गाय आणि एक कालवडीच्या शेण-गोमुत्रापासून बनवलेल्या उत्पादनांमधून त्यांना वर्षाकाठी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतो.
सुनंदाताई या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लांडेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या कुटुंबाला चांगलं खायला मिळावं आणि विषमुक्त अन्नापासून दूर राहावं यासाठी त्यांनी कोरोना काळात सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच त्यांनी एक देशी गाय घेतली आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. पण मधल्या काळात त्यांच्या पतीचे निधन झाले.
पुढे त्यांनी गाईच्या शेण आणि गोमूत्रांपासून इतर उत्पादने बनवण्याचा निर्णय घेतला. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांनी पंचगव्याचे प्रशिक्षण घेऊन विविध उत्पादने बनवायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी देशी गाईच्या शेणापासून १० बेडचे गांडूळ खत बनवले आणि त्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर त्यांना धीर मिळाला आणि शेणापासून धूप, दंतमंजन, फेसपॅक, साबण या वस्तू त्यांनी घरी बनवून विक्री करायला सुरुवात केली.
या वस्तू प्रदर्शनात आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विक्री करत असताना त्यांनी देशी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या बनवायलाही सुरुवात केली. गोमूत्र अर्क, गांडूळ खत, धूप, दंतमंजन, फेसपॅक, गौऱ्या आणि साबण या उत्पादनांच्या विक्री मधून खर्च वजा जाता त्यांना वर्षाकाठी जवळपास ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
केवळ एक गाय आणि तिच्या कालवडीपासून वर्षाकाठी त्यांना हे उत्पन्न मिळते. गाईच्या दुधाव्यतिरिक्त शेण-गोमुत्रापासून घरच्या घरी उत्पादने बनवून आपल्याला जास्तीत जास्त नफा कमवता येऊ शकतो हे सुनंदाताईंनी सिद्ध करून दाखवले आहे. अल्पभूधारक शेती करता करता त्यांनी या उत्पादनांपासून उत्पन्नाचा वेगळा स्त्रोत निर्माण केला आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी दाखवलेला धीर आणि केलेली यशस्वी प्रगती हा इतर शेतकरी महिलांसाठी प्रेरणा देणारा प्रवास आहे.