महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात कृषी या कॅटेगरीमध्ये बाळासाहेब पाटील रा. माळकरंजा, ता. कळंब, जि. धाराशिव यांची निवड करण्यात आली आहे.
बाळासाहेब बापुराव पाटील यांच्या हातात शिक्षकाची नोकरी होती; मात्र त्यांना समाधान मिळत नव्हते. अखेर त्यांनी धाडसी निर्णय घेत, नोकरी सोडून काळ्या मातीत रमण्याचा मार्ग निवडला.
हा निर्णय अनेकांना वेड्यासारखा वाटला. नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय जवळच्यांनाही धक्का देणारा होता; पण बाळासाहेबांनी शब्दांत नव्हे, तर कृतीतून उत्तर दिले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तीस एकरांची त्यांची शेती आज केवळ वावर न राहता प्रयोगशील कृषी प्रयोगशाळा बनली आहे. सुरुवातीचे दिवस कठीण होते.
उत्पन्नाची अनिश्चितता, नवे प्रयोग आणि अपयश यांचा सामना करावा लागला; मात्र त्यांनी सातत्य ठेवले. झिरो बजेट शेती, सुधारित वाणांचा वापर, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धती यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.
ठिबक व सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची टंचाई त्यांच्या शेतात कधीच अडथळा ठरली नाही. पपई, आवळा, शेवगा यांसारखी बारमाही फळपिके आणि हंगामी पिकांचे संतुलित नियोजन हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे.
एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांनी जोखीम विभागली. वाढता मजुरी खर्च लक्षात घेऊन आवश्यक तिथे यांत्रिकीकरणाचा वापर केला.
शंभर फूट लांबीची विहीर, दोन शेततळी, मत्स्यपालन व कुक्कुटपालन यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत तयार झाले. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे; पण नफ्यासोबत टिकाऊपणाचा विचार करणारा व्यवसाय आहे.
सुरक्षित चौकटीबाहेर पडून समाधानाचा मार्ग निवडणारी ही कहाणी प्रेरणादायी आहे. ती यशाच्या आकड्यांपेक्षा निवडीची आहे.
सुरक्षिततेच्या चौकटीबाहेर पडून त्यांनी जे आयुष्य निवडले, त्यात कष्ट आहेत, अनिश्चितता आहे; पण त्याहून मोठा आहे तो समाधानाचा ओलावा! शेतीला मागास समजणाऱ्यांसाठी बाळासाहेबांची शेती हे जिवंत प्रत्युत्तर आहे.
