बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते.
उन्हाळा! डोक्यावर कडक ऊन, उच्च उष्ण तापमान, गरम हवा, तापलेली जमीन, घामाच्या धारा, पाण्याची कमतरता, प्राणीपक्षी माणसांची होणारी काहिली! उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतुंपैकी बहुतेकांना नकोसा वाटणारा ऋतू म्हणजे उन्हाळा.
सर्वसाधारणपणे होळीपासून उन्हाळा सुरू होतो. झाडांच्या सावलीत मिळणारा गारवा उन्हाळ्यात झाडांची गरज लक्षात आणून देतो. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत जात असल्याने काही वर्षापासून हा उन्हाळा असाहाय्य होऊ लागलेला आहे.
उच्च तापमानाचे नवे नवे रेकॉर्ड बनत आहेत. उन्हाळ्याच्या त्रासामुळे एकंदरीतच हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही. पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंप्रमाणे उन्हाळा आल्हाददायक नसला तरी निसर्गचक्रामध्ये उन्हाळा खूप महत्त्वाचा ठरतो.
रंगपंचमी दरम्यान जेव्हा आपण रंगांची उधळण करत असतो त्याचवेळी निसर्गानेही रंगांची उधळण सुरू केलेली असते. पळस, काटेसावर या जंगली झाडांची लाल, भगवी फुले याच ऋतूमध्ये फुलतात.
पानझड झालेली असल्याने ही फुले झाडांवर अधिक उठून दिसतात. चैत्राच्या पालवीत झाडांना जी नवीन पालवी फुटते त्यामुळे झाडांवर लालसर, पोपटी रंग दिसू लागतो.
यादरम्यान आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे बेहडा, खैर, मोह, आपटा, ऐन यांसारख्या आणखी अनेक जंगली झाडांना बिया येतात. मार्च ते मे महिन्यादरम्यान विविध जंगली झाडांना शेंगा, फळे लागून बिया तयार होतात. उन्हाळ्यामध्ये किटकांसाठी या बिया म्हणजे अन्नाचा मुख्य स्त्रोत असतात.
बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात आणि त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते.
उन्हाळ्यामध्ये पसरलेल्या या बियांना पावसाच्या पाण्यामुळे नवे कोंब अंकुरतात. उन्हाळ्यातील तीव्र उन्हामुळे शेतजमीन तापून निघते आणि जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.
पूर्वी या तापलेल्या मातीमध्ये पिकाचे बियाणे टाकले जायचे. येणाऱ्या पहिल्या पावसावर ते बियाणे रुजायचे या प्रकाराला 'धूळ पेरणी' म्हणायचे.
माणूस उन्हाचा पुरेपूर वापर करून आपल्या आहारामध्ये लागणाऱ्या साठवणुकीच्या पदार्थांची सोय करतो. उन्हाळ्यात आजही गावाकडच्या अंगणामध्ये मसाल्यासाठी लागणारे मिरची, हळकुंड, गरम मसाल्याचे पदार्थ उन्हात वाळत घातलेले दिसतात.
लोणची, कुरडया, फेण्या, पापड ही वाळवण अंगणात पसरवलेली दिसतात. शेतामध्ये पिकलेल्या कडधान्यांच्या बियाणाला कीड लागू नये म्हणून त्याला उन्हामध्ये तापवून, त्यात राख टाकून भरून ठेवले जाते.
दरवर्षी घरच्या कामासाठी लागणारे सरपण म्हणजे शेणाच्या वाळवलेल्या गोवऱ्या, वाळलेले लाकूड उन्हाळ्यामध्ये जमा करून ठेवतात. प्रत्येक ऋतूच्या वैशिष्ट्यांचा वापर करायला माणूस अनुभवाने शिकलेला आहे.
निसर्गातील प्रत्येक ऋतू आणि ऋतूमधील प्रत्येक बदलाचे स्वतःचे असे एक वैशिष्टच आहे. उन्हाळ्यातील उन्हाचे निसर्ग चक्रामध्ये मोठे योगदान आहे.
- श्रुतिका शितोळे
पर्यावरण अभ्यासक
अधिक वाचा: Van Sheti : वनशेती म्हणजे काय? अन् काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर