करटुले/करटोली (Momordica dioica) हे कुकुर्बिटेसी (Cucurbitaceae) कुळातील एक बहुवर्षायू वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे. औषधीदृष्ट्या महत्त्वपूर्ण व पोषणमूल्याने समृद्ध अशी ही भाजी भारतात विविध स्थानिक भाषांमध्ये कांकडा, मठा कारले, काकरोळ, कारटोली, कंतोळ, भटकरेले, काकसा, बनकरोळ इत्यादी नावांनी ओळखली जाते. विशेष की, करटुले हे कारल्याच्या जातीशी निगडीत असले तरी ते कारल्याइतके मात्र लोकप्रिय नाही.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे ग्राहकांमध्ये या भाजीबाबत असलेली कमी जागरूकता. ही कंदजन्य भाजी प्रामुख्याने पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लागवड केली जाते. तसेच छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांतील जंगल भागांमध्ये ही भाजी नैसर्गिकरित्या उगवते व तेथील आदिवासी समाज नियमितपणे तिचा आहारात समावेश करतो.
करटुलेचे फळ लहान, चोचीसारखे टोकदार, मऊ काट्यांनी झाकलेले व दाट असते. त्याचा रंग हिरवा असून पूर्ण पिकल्यावर पिवळसर होतो. या फळांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह तसेच सर्वाधिक प्रमाणात कॅरोटीन आढळते. या भाजीला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असली तरी तिचा योग्य वापर होत नाही आणि ती कमी प्रमाणात घेतली जाते. यामागील प्रमुख कारणे म्हणजे या पिकाचा शाकीय पद्धतीने होणारा प्रसार व त्याचा द्विलिंगी (dioecious) स्वभाव.
करटुल्यामध्ये सिद्ध झालेले पोषण व औषधी मूल्य, दीर्घकालीन साठवणक्षमता, लांब अंतरावर वाहतुकीस सहनशीलता व जास्त बाजारभाव या गुणधर्मांमुळे ते कारल्याप्रमाणे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक होऊ शकते व शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढवू शकते. मात्र यासाठी शेतकऱ्यांना या पिकाची शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.
यामध्ये खोडाच्या कलमांद्वारे लागवड, कंदांपासून लागवड, शेतात आवश्यक तेवढ्या नर : मादी रोपांचे प्रमाण राखणे, ज्यामुळे अधिक फळधारणा होईल, तसेच सुधारित व अधिसूचित वाणांचे दर्जेदार रोपसाहित्य वापरणे अशा सुधारित लागवड तंत्रांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.
पौष्टिक गुणधर्म
करटुले स्वादिष्ट, किंचित गोडसर व पूर्णपणे कडूपणाशिवाय असल्यामुळे खाण्यास योग्य आहे. हे अँटिऑक्सिडंट्स तसेच इतर पोषक तत्त्वांचे उत्तम स्त्रोत आहे जसे की बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्व C, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम. या भाजीचा उपयोग औषधांमध्येही केला जातो. साधारणपणे ताज्या फळामध्ये सुमारे ८४.१ ते ८७ टक्के पाणी आढळते.
औषधी गुणधर्म
करटोलीचे औषधी व रोगनिवारक गुणधर्म प्राचीन काळापासून ज्ञात असून ते परंपरेने पिढ्यानपिढ्या पुढे चालत आले आहेत. पानांचा काढा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
कंदामुळे डोकेदुखी, जास्त घाम येणे, मूत्रपिंडात खडे होणे व अर्धशिशी (मायग्रेन) यामध्ये आराम मिळतो, तर फळ मधुमेह व रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
छत्तीसगडमधील आदिवासी समाजात कंदांचा वापर अतिसार, ताप व संधिवातावर उपचारासाठी केला जातो. तसेच बियांचा वापर छातीचे विकार कमी करण्यासाठी व मूत्रविसर्जनास प्रवृत्त करण्यासाठी केला जातो.
क्रमश:
डॉ संतोष चव्हाण
विषय विषेशज्ञ (उद्यान विद्या)
डॉ प्रवीण चव्हाण
विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार)
संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी नांदेड.