महाराष्ट्र राज्यातील हवामान बहुतांशी समशितोष्ण कोरडे आहे. कमी पाऊस व पावसातील खंड याचे प्रमाण जास्त असल्याने वेळोवेळी सिंचनाची आवश्यकता भासते.
अशा वेळी बाष्पीभवन कमी करणे व पर्यायाने पिकांची पाण्याची गरज कमी करणे हे पाणी बचत करण्यासाठी आवश्यक असते.
आच्छादनामुळे पाण्याची कमतरता/दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही अंशी कमी होण्यास व पिक वाढीस व पर्यायाने उत्पादन वाढविण्यास मदत होते.
उदाहरणार्थ संत्रा, डाळींब व अन्य पिकांना १२-१५ दिवसांच्या अंतराने पाणी देत असल्यास आच्छादनामुळे सिंचनाचा कालावधी २०-२५ दिवसांपर्यत वाढविता येते व पर्यायाने पाण्याची बचत होते. आच्छादनाचे इतर फायदे खालीलप्रमाणे आहेत.
आच्छादनाचे इतर फायदे
१) आच्छादन मातीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखते व ओलावा टिकून राहिल्यामुळे २५ ते ३० टक्के पाण्याची बचत होते.
२) तणांची वाढ लक्षणीयरीत्या रोखली जाते.
३) आंतरमशागतीचे कामे कमी होते व खर्चात बचत होते.
४) काही परावर्तीत प्लास्टिक आच्छादनामुळे पिकांवर विषाणूजन्य रोगांचे वाहक असणाऱ्या किडींचे नियंत्रण होते.
५) आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.
६) मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.
७) आच्छादनामुळे जमिनीत ओलावा आणि वायूंचे आदानप्रदान अधिक चांगल्या पद्धतीने होऊन मुळाच्या सदृढ वाढीसाठी मातीचे स्वरूप जसेच्या तसे राखले जाते.
८) पीक काढणीस लवकर तयार होते.
९) फळे भाजीपाला व जमिन, माती यांच्यातील थेट संपर्कास प्रतिबंध करतात व त्यामुळे फळे व भाजीपाला सडण्याचे प्रमाण कमी होते.
१०) प्लास्टिक आच्छादन उष्णता प्रवाहनासाठी अयोग्य असल्यामुळे सूर्यप्रकाशाचे प्रखरता कमी होते.
११) नत्रयुक्त व पालाशयुक्त खते प्लास्टिकचे आच्छादन नसल्यास निचऱ्याचे पाण्याद्वारे सहज निचरून जातात तर आच्छादनामुळे हे प्रमाण कमी होऊन खताची बचत होण्यास मदत होते.
१२) एका प्लास्टिक आच्छादनावर आपण किमान २-३ पिके काढू शकतो. त्यामुळे लागवड खर्चात बचत होते.
आच्छादनाचे प्रकार
१) सेंद्रिय आच्छादन
सेंद्रिय आच्छादन हे भाताचा पेंढा, गव्हाचा पेंढा, उसाचे पाचट, साल, कोरडे गवत, कोरडी पाने, भूसा, गवत इत्यादी नैसर्गिक पदार्थांपासून बनलेला असतो. ही सेंद्रिय आच्छादन सामग्री सहजपणे विघटित होतात.
२) पेंढा आच्छादन
हे सर्वात सामान्य वापरले जाणारे सेंद्रिय आच्छादन आहे. भाजीपाला पिके आणि फल पिकांसाठी भात आणि गव्हाचा पेंढा ही सहज मिळणारी आच्छादन सामग्री आहे. तांदूळ आणि गव्हाचा पेंढा कुजल्यानंतर माती अधिक सुपीक बनते.
३) गवताचे आच्छादन
ही सर्वात सहज उपलब्ध आच्छादनापैकी एक आहे. हिरवे गवत किंवा कोरडे गवत, गवत आच्छादनासाठी वापरले जाते. कुजल्यानंतर गवत जमिनीला नायट्रोजन पुरवते. पावसाळ्यात, हिरवे गवत तेथेच रूजते. म्हणून आच्छादनासाठी कोरडे गवत वापरावे.
अधिक वाचा: डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज? पहा सविस्तर वेळापत्रक