प्रो ट्रे (pro tray) रोपवाटिकेमध्ये कमी जागेत जास्त आणि समान रोपे तयार होतात. कोकोपीट, व्हर्मी कंपोस्टचा वापर करून मातीशिवाय रोपे तयार होतात, अधिक सशक्त रोपे तयार होतात. शेडनेटचा वापर केल्यास उन्हाळी रोपे तयार करता येतात.
प्लास्टिक प्रो ट्रे म्हणजे काय?
प्लास्टिक प्रो ट्रे हा एक विशेष प्रकारचा ट्रे असतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे (उदा. ५०, ९८, १०४, १२८, २०० सेल्स) कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यात एक बी टाकले जाते, ज्यामुळे प्रत्येक रोप स्वतंत्र वाढते.
प्रो ट्रेचा वापर करण्याचे फायदे
◼️ जास्त उगवणक्षमता
ट्रेमध्ये उबदार वातावरण आणि नियंत्रित पाणी/अन्न मिळाल्याने उगवणीची टक्केवारी ९०% पेक्षा अधिक होते.
◼️ मुळे मजबूत आणि निरोगी
प्रत्येक रोपाला स्वतंत्र जागा मिळते, त्यामुळे मुळे गुंतत नाहीत. रोपांची लागवड करताना मुळांना धक्का लागत नाही.
◼️ कीड आणि रोगांचे नियंत्रण
मातीचा संपर्क कमी असल्याने डॅम्पिंग-ऑफ सारखे रोग टाळता येतात. जैविक नियंत्रण वापरणे सोपे होते.
◼️ कमीत कमी बियाण्यांचा वापर
प्रत्येक ट्रे मध्ये एकच बी टाकले जाते, त्यामुळे बियाण्यांची नासाडी टळते.
◼️ एकसारखी रोपे
रोपे सारख्या उंचीची, ताकदवान आणि लावणीसाठी तयार असतात.
◼️ सुलभ वाहतूक आणि व्यवस्थापन
ट्रे हलके असतात. रोपे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतात.
प्रो ट्रेमध्ये रोपांचे व्यवस्थापन
१) प्रो ट्रे ची निवड
टोमॅटो, मिरची, कोबी, वांगीसाठी ९८ किंवा १०४ सेल्सचा ट्रे वापरावा. कोथिंबीर, मेथीसाठी १२८ किंवा त्याहून अधिक सेल्सचा ट्रे वापरावा.
२) माध्यम भरणे
कोकोपीट + गांडूळ खत + ट्रायकोडर्मा या मिश्रणाने ट्रे भरावा. माती वापरू नये. माध्यम निर्जंतुकीकरण केलेले असावे.
३) बीज पेरणी
प्रत्येक सेलमध्ये १ बी ठेवावे आणि थोडेसे माध्यम टाकून झाकावे.
४) पाणी देणे
हलक्या हाताने स्प्रे किंवा ड्रिपने पाणी द्यावे. ट्रे अर्ध सावलीत ठेवा. शेडनेटचा वापर करा.
५) खत व जैविक नियंत्रण
ट्रायकोडर्मा, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांचे स्प्रे करावेत.
अधिक वाचा: चवदार, मऊ व गोडसर हुरड्यासाठी निवडा सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या 'ह्या' तीन जाती
