उन्हाळी हंगामात मूग लागवड फायदेशीर ठरत आहे. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान मुगाची पेरणी करावी. या पिकाला मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन मानवते.
जमिनीची उभी-आडवी नांगरट करून ढेकळे फोडून माती बारीक करावी. फळी मारून जमीन सपाट करावी. योग्य आकाराचे सपाट वाफे करून दोन वाफ्यांमध्ये पाण्याचे पाट ठेवावेत.
वाणांची निवड
१) विद्यापीठाने रब्बी हंगामासाठी दापोली मूग-१ ही जात कोकणासाठी शिफारस केली असून हे वाण ७१ ते ७५ दिवसात तयार होते. सरासरी उंची ५० ते ५५ सेमी असून, वाणापासून १२ ते १५ क्विंटल एवढे हेक्टरी उत्पादन मिळते.
२) पुसा-वैशाखी, वैभव, फुले एम-२, कोपरगांव, जळगाव-७८१, टी. ए. पी - ७, तैवान मूग, ट्रॉम्बे मूग बीन या ६० ते ७५ दिवसांत होणाऱ्या हेक्टरी सात ते २० क्विंटल उत्पादन देणाऱ्या सुधारित जातीची शिफारस केली आहे.
बीजप्रक्रिया
बियाण्याला प्रती किलोस २.५ ग्रॅमप्रमाणे प्रथम बुरशीनाशकाची आणि शेवटी पेरणीपूर्वी २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
लागवड कशी कराल?
हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फूरद पेरणीपूर्वी सरीमध्ये बियाण्याखाली देऊन मातीमध्ये मिसळून घ्यावे व नंतर पेरणी करावी. लागवडीसाठी ३० सेंटीमीटर बाय १० सेंटीमीटर अंतर ठेवावे.
पाणी व्यवस्थापन
या पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची वेळ, पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगामध्ये दाणे भरण्याच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी.
आंतरमशागत
पिकाची उगवण झाल्यानंतर १० दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची विरळणी करून घ्यावी. साधारणपणे १५ ते १८ दिवसांनी कोळपणी करावी, तसेच ४० दिवसांनी बेणणी करावी.
पिक संरक्षण
पाने खाणारी अळी, तुडतुडे व मावा या किडीपासून मूग पिकाचे संरक्षण करण्यासाठी गरजेनुसार ६०० मिली प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५०० लि. पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारा द्यावा. करपा रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास एक हेक्टर क्षेत्रावर फवारा द्यावा करपा रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास एक लिटर पाण्यात २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
शेंगा तोडणी
शेंगा पक्व झाल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर साधारणतः ६० ते ७० दिवसांनी या पिकाच्या शेंगाची तोडणी करावी. शेंगाचा हिरवा रंग बदलून तो पिवळसर तपकिरी होऊ लागतो. त्यावेळी हिरवा रंग बदलून तो पिवळसर तपकिरी होऊ लागतो. त्यावेळी शेंगा तोडणीस तयार होतात. ऊशिरा वा कडक उन्हात तोडणी करू नये, अन्यथा शेंगा तडकून उत्पन्नात घट होते. शेंगांची तोडणी शक्यतो सकाळी करावी म्हणजे शेंगा तडकत नाहीत. पक्व शेंगांची तोडणी दोन ते तीन वेळा करावी.
मुगाला चांगली मागणी
बाजारपेठेत मुगाला चांगली मागणी असून दरही चांगला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकासाठी मूग लागवड फायदेशीर ठरत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश व हवामान उष्ण असल्यामुळे पीक चांगले येते. विशेष म्हणजे या कालावधीत कीडरोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. सिंचनाची सुविधा असेल, तर मुगाचे उत्पादन चांगले मिळते. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांत पीक काढणीसाठी तयार होते.
अधिक वाचा: Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुगाची लागवड करताय? कोणत्या जाती निवडाल?