Join us

रब्बी मका लागवड तंत्र; जाणून घ्या अधिक उत्पादन देणारे फायद्याचे तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:05 IST

Rabi Maize Crop Management : महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील एक महत्त्वाचे पीक म्हणून मका या पिकाचा उल्लेख केला जातो. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि हमखास उत्पन्न मिळवता येते.

महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील एक महत्त्वाचे पीक म्हणून मका या पिकाचा उल्लेख केला जातो. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि हमखास उत्पन्न मिळवता येते.

तृणधान्य पिकांच्या जागतिक उत्पादनात गहू आणि भात यांच्यानंतर मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्याच्या पलिकडेही मक्याचा उपयोग स्टार्च, अल्कोहोल, गोंद, रंग, कृत्रिम रबर यांसारख्या विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

राज्याच्या पातळीवर पाहता, यंदाच्या रब्बी हंगामात मका लागवडीचे क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले असून, ते २.५८ लाख हेक्टरवरून थेट ४.८४ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. ही वाढ मुख्यतः केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी केलेल्या धोरणात्मक उपाययोजना, तसेच पशुखाद्य, कुक्कुटपालन खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या मागणीमुळे झाली आहे.

यासोबतच मक्याच्या बाजारभावातील स्थिरतेनेही शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला असून, त्यामुळे रब्बी हंगामात लागवडीस उत्साहाने प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हवामान व जमीन

मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड अशा सर्व हवामानात येणारे पीक आहे. मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचरा असणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणारी व जलधारण क्षमता अधिक असलेली जमीन चांगली असते.

पूर्वमशागत

लागवडीसाठी निवडलेली जमीन तण आणि पूर्वी घेतलेल्या पिकांच्या अवशेषांपासून मुक्त असावी. जमिनीची खोल (१५ ते २० सें.मी.) नांगरट करावी. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेणखत हेक्टरी १० ते १२ टन टाकावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

पेरणी

रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी करावी. एखादा-दुसरा आठवडा पेरणीस उशीर झाल्याने उत्पादनात फारसा फरक पडत नाही. रब्बी हंगामात मका पिकाची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. ३-४ से.मी. खोलीवर बियाणे पेरावे.

पेरणीचे अंतर व बियाणे प्रमाण

सरी वरंबा पद्धतीत मका पिकाची पेरणी टोकण पद्धतीने करावी. पट्टा पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्न वाढ आढळून आले आहे. उशिरा येणाऱ्या आणि मध्यम जातींसाठी ७५ सें.मी. × २० सें.मी. अंतरावर टोकण करावे. लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० सें.मी. × २० सें.मी. अंतरावर टोकण करावे. बियाणे प्रमाण १५ ते २० किलो/हेक्टरी.

मका पिकाचे वाण व वैशिष्ट्ये

१) मांजरी – ९०-११० दिवस; संमिश्र वाण; उत्पन्न ४० ते ५० क्विंटल/हे.; नारंगी, पिवळे दाणे.२) राजर्षी – १००-११० दिवस; संकरित वाण; उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल/हे.३) डेक्कन १०५ – १००-११० दिवस; संकरित वाण; उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल/हे.४) करवीर – १००-११० दिवस; संमिश्र वाण; उत्पन्न ४० ते ५० क्विंटल/हे.; नारंगी, पिवळे दाणे.५) आफ्रिकन टॉल – संमिश्र वाण (चाऱ्यासाठी सर्वोत्तम); उत्पन्न ६० ते ७० टन हिरवा चारा/हे. आणि धान्य ५० ते ५५ क्विंटल/हे.

बीजप्रक्रिया

करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच अॅझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा १०० मि.ली. प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन

रब्बी मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र द्यावे. तसेच पेरणीनंतर ४५ दिवसांनी उर्वरित ४० किलो नत्र द्यावे.

पाणी व्यवस्थापन

मका पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते, म्हणून महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी देणे आवश्यक असते.

  • पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे.

  • पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी (पिकाची शाकीय अवस्था)

  • पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी (पिक फुलोऱ्यात असताना)

  • दाणे भरण्याच्या वेळी (७५-८० दिवसांनी)

रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. रब्बी हंगामात ठिबक सिंचनाचा वापर करून मका लागवड करता येते, ज्यासाठी योग्य जमीन, हवामान आणि वाणाची निवड आवश्यक आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. खते दिल्यावरही त्याचा उपयोग होतो. ठिबकवर लागवड करताना ४ फूट किंवा ५ फूट अंतरावर नळी असेल तर नळीच्या दोन्ही बाजूला साधारणतः ८ ते ९ इंच अंतरावर लागवड करावी. दोन रोपांतील अंतर १० इंच ठेवावे.

आंतरमशागत

पेरणी संपताच चांगल्या वाफशावर तण नियंत्रणासाठी अँटूटॉप ५०% प्रवाही २ ते २.५ किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारावे. तणनाशक फवारणीनंतर १५ ते २० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये.

पीक संरक्षण

अ. किड नियंत्रण

१) खोडकिडा नियंत्रण – ईमिडाक्लोप्रिड १ मि.ली./लिटर पाण्यातून फवारावे किंवा कार्बारील भुकटी (८५%) १७०० ग्रॅम/हे. ५०० लिटर पाण्यातून फवारावी.२) गुलाबी अळी – ट्रायकोडर्मा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रति हेक्टरी लावावेत.३) मावा व तुडतुडे – डायमिथोएट १ मि.ली./लिटर पाण्यातून फवारावे.४) हिरवे कणसे पोखणाऱ्या अळ्या – मिथिल पॅराथीऑनची भुकटी २० ते ३० किलो/हे. धुरळावी.

ब. रोग नियंत्रण

१) खोड कुजव्या रोग – रोगाची लक्षणे दिसताच ७५% कॅप्टन १२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात जमिनीतून दिल्यास पीथियम खोड कुजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.२) करपा रोग - रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार डायथेन एम- ४५ किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

 

काढणी, मळणी व साठवणूक

धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी. प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत, त्यानंतर मका सोलणी यंत्राने कणसातील दाणे काढावेत. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही.

उत्पादन

संकरीत वाण १०० ते ११० क्विटल / हेक्टरी, संमिश्र वाण ४० ते ५० क्विटल / हेक्टरी, चारा पिके ६० ते ७० टन हिरवा चारा / हेक्टरी.

- डॉ. गणेश बहुरे प्राचार्य, श्री साई जनविकास प्रतिष्ठान, कृषि महाविद्यालय, खंडाळा ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर.

हेही वाचा : गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक

English
हिंदी सारांश
Web Title : Rabi Maize Cultivation: Techniques for Higher, Profitable Yields Explained

Web Summary : Rabi maize cultivation in Maharashtra offers higher yields. Increased demand for ethanol, animal feed, and stable market prices drive expansion. Select well-drained soil, use proper fertilization, irrigation and pest control. High yielding varieties are key for profitable farming.
टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतकरीशेतीलागवड, मशागतपेरणीपीक व्यवस्थापनरब्बी