Join us

डाळिंब बागांना आच्छादनाची असेल साथ; तरच तीव्र उष्णतेपासून वाचेल बाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 10:36 IST

उन्हापासून संरक्षण : ओलावा टिकण्यासाठी उसाच्या पाचटचा उपयोग

गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर गेलेले आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने डाळिंब बागा तोडक्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे जतन केल्या जात आहेत. यावर उपाय म्हणून देऊर शिवारात शेतकऱ्यांनी महागड्या पांढऱ्या नेट कापडाने बागांना आच्छादन केले आहे. यामुळे डाळिंब बाग उष्णतेपासून वाचत असून, सध्या हंगामात डाळिंब बागा फळ अवस्थेत आहे.

काही ठिकाणी फळावर आलेल्या बागांवर सनबर्निंगचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. पाणीटंचाई, वाढत्या उष्णतेचा बागांना फटका बसू नये, म्हणून पांढऱ्या जाळीदार नेटने आच्छादन केले जात आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याची काटकसर करत आंबिया बहार घेण्याचे धाडस केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पातळी खालावली असून, उष्णतेच्या तीव्र झळा सर्वत्र बसत आहे. अगोदरच नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या पुढे उभी आहे.

त्यात डाळिंबावरील मर रोग, बदलते वातावरण असे विविध प्रश्न डाळिंब पिकवण्यासाठी उभे आहेत. वाढत्या तापमानामुळे फूल गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे झाडावरची फळ संख्या कमी होणार आहे. धुळे तालुक्यात बहुतेक शेतकरी भाजीपाला व फळ शेतीकडे वळले आहेत. फळ शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावले असले, तरी वाढत्या तापमान व अवकाळी पावसाच्या बदलामुळे यंदा शेतकरी हतबल झाले आहेत.

हेही वाचा - दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा

टॅग्स :डाळिंबफळेदुष्काळपाणीकपातपीक व्यवस्थापनशेतीशेतकरीधुळे