मराठवाडा हा महाराष्ट्रातील प्रमुख फळबागांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मोसंबी, आंबा, केळी, डाळिंब आणि द्राक्ष इत्यादी फळपिके या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार आहेत.
हवामान बदलामुळे उन्हाळ्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च ते मे महिन्यांत ४० ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारे तापमान, उष्णतेच्या लाटा अणि कोरडी हवा यामुळे फळ बागेच्या उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बदलत्या परिस्थितीत आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषतः ठिबक सिंचन आणि क्रॉप कूलिंग यांचा संयुक्त वापर हा वाढत्या तापमानावर प्रभावी उपाय ठरू शकतो.
अलीकडे मोसंबी, डाळिंब, आंबा फळबागांवर फळधारणा चांगली झालेली असुन वाढलेल्या तापमानामुळे गळ होत आहेत तसेच उच्च तापमानामुळे झाडांवर उष्णतेचा ताण येऊन झाडाची वाढ खुंटत आहे, फुलांची संख्या कमी होऊन, लागलेली फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढत आहे.
अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे झाडांमधील बाष्पोत्सर्जन वाढते आणि पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे फळांचा आकार लहान राहतो, साखरेचे प्रमाण कमी होते आणि बाजारमूल्य घटते.
तीव्र सूर्यप्रकाशामुळे फळांच्या सालीवर तपकिरी किंवा काळे डाग पडतात. काही वेळा फळाची साल जळल्यासारखी दिसते यालाच शेतकरीवर्ग सनबर्न असही म्हणतात अणि हि बाब विशेषत केळी, द्राक्षे आणि मोसंबी फळ बागेमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
उष्ण व कोरडे वातावरणामुळे थ्रिप्स, मावा, लाल कोळी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. उच्च तापमानामुळे मातीतील आर्द्रता वेगाने कमी होते.
पर्णरंद्राची कार्यक्षमता कमी होऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते तसेच बाष्पीभवनांचा वेग वाढून वारंवार सिंचनाची आवश्यकता भासते.
काय आहे क्रॉप कूलिंग तंत्रज्ञान?◼️ बदललेल्या वातावरणामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम कमी करण्यासाठी क्रॉप कूलिंग तंत्रज्ञान हे अत्यंत प्रभावी उपाय म्हणून पुढे येत आहे.◼️ या तंत्रज्ञानात सूक्ष्म फवारणीद्वारे झाडांच्या कॅनोपीवर हलक्या पाण्याचे थेंब फवारले जातात.◼️ यामुळे झाडांच्या सभोवतालचे तापमान काही अंशांनी कमी होते आणि झाडांवरील उष्णतेचा ताण कमी होतो.◼️ ठिबक सिंचनासोबत क्रॉप कूलिंगचा वापर केल्यास झाडांच्या पानाचे व परिसरातील तापमान २ ते ४°से पर्यंत कमी होऊ शकते, त्यामुळे उष्णतेचा दाह कमी होतो.◼️ झाडांवरील ताण कमी झाल्यामुळे फुलधारणा व फळधारणा टिकून राहते.◼️ फळांचा आकार, रंग, दर्जा आणि चव सुधारते तसेच सनबर्नचे प्रमाणही कमी होते.◼️ ठिबक सिंचनामुळे पाणी थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचत असल्याने पारंपारिक सिंचनाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.◼️ योग्य तापमान व आर्द्रता व्यवस्थापनामुळे फळांचे उत्पादन आणि दर्जा दोन्ही वाढतात.◼️ ठिबक व तुषार प्रणालीद्वारे पाण्यासोबत विद्राव्य खते दिल्यास झाडांना अन्नद्रव्ये प्रभावीपणे वेळेवर मिळतात.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील फळबागांसाठी पाणी बचत तंत्रज्ञान, हवामान अनुकूल शाश्वत व्यवस्थापन आणि आधुनिक सिंचन प्रणालींचा वापर अत्यावश्यक झाला आहे.
क्रॉप कूलिंग आणि ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा संयुक्त वापर केल्यास वाढत्या तापमानाचा परिणाम कमी करून फळबागांचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकवून ठेवता येते.
भविष्यात मराठवाड्यातील फळबागांची शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि स्वीकार ही काळाची गरज ठरणार आहे.
- गुणवंत एस डफरेवरिष्ठ कृषी तज्ञ
अधिक वाचा: पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; 'ह्या' निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता
Web Summary : Crop cooling technology helps Marathwada fruit farmers combat rising temperatures. It involves micro-spraying water, reducing heat stress, improving fruit quality, and saving water. This sustainable approach ensures better yields and farmer income in changing climate.
Web Summary : फसल शीतलन तकनीक मराठवाड़ा के फल किसानों को बढ़ते तापमान से निपटने में मदद करती है। इसमें सूक्ष्म छिड़काव द्वारा पानी का उपयोग, गर्मी के तनाव को कम करना, फलों की गुणवत्ता में सुधार और पानी की बचत शामिल है। यह टिकाऊ दृष्टिकोण बदलते जलवायु में बेहतर उपज और किसानों की आय सुनिश्चित करता है।