ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी हलका पाऊस, अधूनमधून पडणारे उन्ह यामुळे कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्याच्या ऊस लागण क्षेत्रात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
शेतकरी बंधुना सूचित करणेत येते की त्यांनी आपल्या पिकांचे निरीक्षण करून प्रादुर्भाव आढळल्यास उपाययोजना कराव्यात.
किडीचा जीवनक्रम
- ऊसाच्या पानांच्या खालच्या बाजूस मावा आढळतो.
- मादीच्या पोटातून नुकतीच बाहेर पडलेली बाल्यावस्थेतील पिल्ले ही पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून, अतिशय चपळ असतात.
- बाल्यावस्थेमध्ये चार वेळा कात टाकली जाते. यांच्या ४ अवस्था आहेत.
- पहिल्या दोन अवस्थेत पिल्लांवर कोणतीही पांढरी लव (लोकर) नसते.
- पुरेसे खाद्य मिळाल्यावर लोकर/लव तयार होते.
- तिसऱ्या अवस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढऱ्या लोकरी सारखे तंतू दिसून येतात.
- लोकरी माव्याचे प्रौढ हे काळे असून, पारदर्शक पंखाच्या दोन जोड्या असतात.
नुकसानीचा प्रकार
- लोकरी मावा उसाच्या पानावरील रस शोषतो.
- कीडग्रस्त पानाच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला व पानावर पिवळसर ठिपके दिसतात.
- पाने कोरडी पडून वाळतात, त्यामुळे ऊस कमकुवत होतो.
- वाढ खुंटून उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते.
- लोकरी माव्याच्या शरीरातून बाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट द्रवामुळे पानावर काळ्या रंगाच्या परोपजीवी बुरशींची वाढ होते.
- संपूर्ण पान काळे पडल्याने त्यांची अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते. परिणामी उत्पादनात घट येते.
उपाययोजना
- कीडग्रस्त भागात उसाची पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने लागवड करावी. यामुळे प्रादुर्भावानंतर नियंत्रणाचे उपाय करणे सोपे होते.
- कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये.
- बेणे निवडून झाल्यानंतर उसाची पाने जाळून टाकावीत.
- ऊस लागवडीपूवी बेणे प्रक्रिया करावी.
- रासायनिक खताचा संतुलित वापर करावा.
- नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास किडीला प्रोत्साहन मिळते.
- मावाग्रस्त उसाची हिरवी अथवा कोरडी पाने एका शेतातून दुसऱ्या शेतात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात नेऊ नयेत.
- शेतकरी बांधवांनी किडीबरोबर मित्र किटकांची संख्या देखील तपासावी आणि पर्याप्त संख्या असल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
- किडीमुळे काळी झालेली पाने जनावरांना खाण्यास देऊ नये.
- क्रायसोपर्ला कारनीया, कोनोबाथा, मगरी अळी, सिरफीड माशी या मित्र किटकाची अंडी, अळ्या पानाच्या मागच्या बाजूस टाचणीने टोचून लावावेत.
- मित्र किटकाची अंडी प्रादुर्भावग्रस्त भागात सोडल्यास त्यांचा प्रसार झपाट्याने होतो व ते चांगले स्थिरावतात.
अधिक वाचा: Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर