रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आणि अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक विचारात घेतल्यास करडईसारखे फायदेशीर दुसरे पीक नाही. करडई हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतातील एकूण करडई क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
अलीकडे करडई लागवडीचे क्षेत्र खूप कमी झाले आहे. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे मोठ्या प्रमाणात हंगामातील पावसात बदल, रोगांचा प्रादुर्भाव, तसेच इतर स्पर्धात्मक पिके उदा. ज्वारी, सूर्यफूल, हरभरा. करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्यामुळे शेतकरी अधिक फायदा देणाऱ्या पिकांकडे वळले.
जागतिक व्यापार खुला झाल्यामुळे स्वस्तात पामतेल आयात करण्याचा पर्याय निवडल्यामुळे करडई तेलाच्या किमती कमी राहिल्या; त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले. वास्तविक पाहता करडई तेल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. करडईच्या तेलात असंपृक्त आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांसाठी करडई तेल उत्तम आहे.
सुधारित लागवड तंत्रज्ञान
जमीन - करडईच्या पिकासाठी मध्यम ते भारी खोल जमीन निवडावी. ६० ते ९० सें.मी. पेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकाचे उत्पन्न घटते. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.
पूर्वमशागत - करडई पिकाची मुळे खोल जात असल्यामुळे खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात.
पेरणीचा कालावधी - करडईची पेरणी योग्यवेळी करणे फार महत्त्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबरचा पहिला पंधरवडा) केल्यास पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते. याउलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा) पीक थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते.
त्यामुळे करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात येते. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी.
बियाणे व बीजप्रक्रिया - पेरणीसाठी करडईचे १० किलो बी प्रती हेक्टरी वापरावे. करडईवरील मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायरम, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम २ ते ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची प्रतिकिलो बियाण्यास ४ ते ५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
पेरणीचे अंतर - करडई पिकाच्या दोन ओळीमधील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर २० सें.मी. ठेवावे.
खतांचे व्यवस्थापन - करडई हे पीक सेंद्रिय व रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणारे आहे. प्रति हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमीन तयार करतांना टाकून त्यावर शेवटची वखराची पाळी घालावी.
रासायनिक खतांचा वापर करावयाचा झाल्यास कोरडवाहू करडईसाठी प्रति हेक्टरी ५० किलो नत्र व ३५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी, तर बागायती पिकासाठी ७५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद दोन चाड्याच्या तिफणीच्या साहाय्याने बियाण्याच्या खाली पडेल अशा पद्धतीने द्यावे.
विरळणी व आंतरमशागत - करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढत असल्यामुळे, पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपांमधील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रति हेक्टरी झाडांची संख्या १,११,१११ एवढी राखावी.
गरजेनुसार खुरपणी व कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीपासून तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दातेरी सायकल कोळप्याने कोळपणी करावी.
अ. क्र. | सुधारित व संकरित जाती | कालावधी (दिवस) | उत्पादन (किं. /हे.) | विशेष गुणधर्म |
१ | भीमा | १२० ते १३० | १२ ते १४ | कोरडवाहू क्षेत्रास योग्य, अवर्षणास प्रतिकारक्षम, मावा व पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक. तेलाचे प्रमाण २९ - ३० %. महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस. |
२ | फुले कुसुम | १२५ ते १४० | जिरायती १२ ते १५, बागायती २० ते २२ | कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याच्या ठिकाणी योग्य. मावा किडीस मध्यम प्रतिकार. तेलाचे प्रमाण ३०%. |
३ | एस.एस.एफ.७०८ | ११५ - १२० | जिरायती १३ ते १६, बागायती २० ते २४ | कोरडवाहू आणि बागायतीसाठी उपयुक्त. माव्यास मध्यम प्रतिकारक. तेलाचे प्रमाण ३१%. महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस. |
४ | फुले करडई (एस.एस.एफ-७३३) | १२० ते १२५ | १३ ते १६ | अधिक उत्पादनासाठी, पांढऱ्या फुलांचा काटेरी वाण. माव्यास मध्यम प्रतिकारक. तेलाचे प्रमाण २९%. |
५ | फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.७४८) | १३० ते १४० | जिरायती १३ ते १५, बागायती २० ते २५ | कोरडवाहू आणि बागायतीसाठी उत्तम. काटेरी वाण. माव्यास मध्यम प्रतिकारक. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस. |
६ | परभणी कुसुम (पी.बी.एन.एस.१२) | १३५ ते १३७ | १२ ते १५ (कोरडवाहू) | कोरडवाहू आणि बागायतीसाठी योग्य वाण. मर व पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक. मावा किडीस सहनशील. दाणे टपोरे. तेलाचे प्रमाण २९%. |
७ | परभणी ४० (बिन) (पी.बी.एन.एस.४०) | ११८ ते १२८ | १५ ते १६ (कोरडवाहू), २० ते २२ (बागायती) | बिनकाटेरी वाण. कोरडवाहू व बागायती लागवडसाठी योग्य. पाकळ्या गोळा करण्यास सुलभ. पानावरील ठिपके व मर रोगास सहनशील. |
८ | नारी - ६ | १३० ते १३५ | १० ते १२ | बिगरकाटेरी. पाकळ्यासाठी योग्य. पानावरील ठिपक्यांच्या रोगास प्रतिकारक्षम. तेलाचे प्रमाण ३०%. संरक्षित पाण्याखालील लागवडीस योग्य. |
संकरीत वाण | ||||
९ | नारी.एन.एच.- १ | १३० ते १३५ | २० ते २३ | संकरित बिगरकाटेरी वाण, पाकळ्यासाठी, संरक्षित माव्यास सहनशील, बागायतीसाठी, अखिल भारतीयस्तरावर लागवड़ीसाठी शिफारस. |
पाणी व्यवस्थापन
एक पाणी : पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी.
दोन पाणी : पेरणीपूर्वी जमीन ओलावणीसाठी पहिले पाणी आणि दुसरे पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी.
तीन पाणी : पहिले पाणी पेरणीपूर्वी जमीन ओलावणीसाठी, दुसरे पाणी पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी व तिसरे पाणी पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.
करडईची फुले उमलण्यास सुरुवात होताच ‘सायकॉसिल’ या वाढ प्रतिरोधकाच्या १००० पीपीएम तीव्रतेच्या (१००० मि.ली. प्रति ५०० लीटर पाणी) द्रावणाची प्रति हेक्टरी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
पीक संरक्षण
• करडई पिकाचे माव्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी ३०% डायमिथोएट (१५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) या कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा थायोमेथॉक्सॅम/अॅसिटामिप्रिड ३ ते ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी, किंवा अॅसिफेट १६ ग्रॅम/१० लिटर पाणी, किंवा क्लोथायनिडीन १ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
• पानावरील ठिपके (अल्टरनेरिया) या रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता कमी झाली नाही, तर १० ते १५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी. तसेच पिकाची फेरपालट करावी म्हणजे रोगाचे नियंत्रण होते.
काढणी
• करडई पीक १३० ते १३५ दिवसांत काढणीस तयार होते. या पिकाची बोंडे व पाने पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. कापणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे काटे टोचत नाहीत. करडई चांगली वाळल्यानंतर बडवणी करावी. एकात्मिक काढणी व मळणी यंत्र पिकाच्या काढणीसाठी उपयुक्त आहे.
• या यंत्राने कमी वेळात व कमी खर्चात करडईची काढणी करता येते. या मशीनमधून स्वच्छ धान्य बाहेर येते आणि कोणतीही प्रक्रिया न करता माल विक्रीसाठी नेता येतो. करडई पिकास काटे असल्यामुळे मजूर काढणीसाठी तयार होत नाहीत. त्यासाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्र हे एक वरदान आहे.
उत्पादन
सुधारित तंत्राचा वापर केल्यास मध्यम जमिनीत करडई पिकापासून प्रति हेक्टरी १२ ते १४ किंटल, तर भारी जमिनीत प्रति हेक्टरी १४ ते १६ किंटल उत्पादन सहज मिळते. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ किंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
डॉ. गणेश कपूरचंद बहुरे
प्राचार्य, कृषि महाविद्यालय, खंडाळा
ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर.