Maize Farming : सध्या पावसाची (Rain) रिपरिप सुरूच आहे. अशा परिस्थितीत मका पीक तुरे लागण्याच्या अवस्थेत असून पिक संरक्षण महत्वाचे आहे. यासाठी सूक्ष्म अन्न द्रव्यांचा वापर करणे आवश्यक आहे. मका पिकास नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक या बरोबरच जस्त या अन्नद्रव्याचा वापर करणे पीक पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
1) जस्त
कमतरतेची लक्षणे - रोपाचा रंग फिकट हिरवा दिसू लागतो. पानाच्या खालच्या अर्ध्या भागात फिकट पिवळ्या रंगाचे उभे पट्टे दिसू लागतात. कालांतराने ते फिकट तपकिरी किंवा राखाडी होऊन पेशी समूहाचा काही भाग नष्ट होतो.
उपाययोजना - पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट १० किलो प्रतिएकर शिफारशीत खत मात्रेसोबत किंवा ४० किलो शेणखतामध्ये आठवडाभर मुरवून द्यावी. उभ्या पिकात कमतरता दिसून येताच साधारणपणे ३५ दिवसांनी चिलेटेड जस्त (Zn-EDTA) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
2) लोह
कमतरतेची लक्षणे - शिरांच्या मधल्या भागात केवडा होऊन पेशी समूहाचा काही भाग नष्ट होतो. पानाच्या संपूर्ण पात्यावर शिरा अगदी ठळक दिसू लागतात.
उपाययोजना - पेरणीच्या वेळी फेरस सल्फेट १० किलो प्रतिएकर शिफारशीत खत मात्रेसोबत किंवा ४० किलो
शेणखतामध्ये आठवडाभर मुरवून द्यावे.
(नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिवसाकरिता स्थगित कराव्यात किंवा पुढील चार दिवस पुढे ढकलावीत.)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी