Krushi Salla : मराठवाड्यात मान्सूनचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. (Krushi Salla)
यामुळे अजून पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी ७५–१०० मिमी पावसाची प्रतीक्षा करूनच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. तण व कीड नियंत्रणावर भर देत पीक व फळबागांची योग्य काळजी घ्यावी, असेही तज्ञांनी सांगितले आहे.(Krushi Salla)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. (Krushi Salla)
येत्या १३ ते १५ जुलै दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, अशी शक्यता आहे. मात्र, १५ जुलैनंतर सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Krushi Salla)
हवामानाचा अंदाज
१३–१५ जुलै दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण व तुरळक हलका पाऊस.
पुढील ४–५ दिवसात कमाल तापमान २–३ अंशांनी वाढेल, किमान तापमानात फारसा फरक नाही.
पेरणीसंदर्भातील मार्गदर्शन
अजून पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी ७५–१०० मिमी पाऊस झाल्यावरच सोयाबीन, बाजरी व इतर खरीप पिकांची बिजप्रक्रिया करून पेरणी करावी.
१५ जुलैपर्यंत मूग, उडीद, भुईमूग व खरीप ज्वारीची पेरणी करणे शक्य आहे.
बाजरीची पेरणी ३० जुलैपर्यंत केली जाऊ शकते.
पिकनिहाय सल्ला
वेळेत पेरणी केलेल्या पिकात अंतरमशागत करून तणनियंत्रण करावे.
खोड माशी, उंट अळी दिसल्यास प्रोफेनोफॉस, इथिऑन, थायामिथॉक्झाम+लॅम्बडा, किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल यापैकी एक कीटकनाशक वापरावे.
पेरणीनंतर २० दिवसांनी इमॅझोमॅक्स+इमिझीथीपायर (२ ग्रॅम/१० लिटर पाणी) फवारणी करून तण नियंत्रण करावे.
खरीप ज्वारी आणि बाजरी
अंतरमशागत करून तण विरहीत ठेवावे.
पाण्याचा ताण जाणवल्यास पाणी द्यावे.
पेरणी न झाल्यास योग्य पावसानंतर बिजप्रक्रिया करून पेरणी करावी.
ऊस
पांढरी माशी दिसल्यास लिकॅनीसिलियम लिकॅनी (जैविक) किंवा क्लोरोपायरीफॉस, इमिडाक्लोप्रिड किंवा ॲसीफेट यापैकी एक कीटकनाशक फवारावे.
पाण्याचा ताण पडू न देता पाणी द्यावे.
फळबाग व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागांना पाण्याचा ताण येऊ देऊ नये, आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
नवीन लागवडीसाठी नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपे खरेदी करावीत.
डाळिंब, चिकू लागवड करताना शिफारस केलेल्या जातींची निवड करावी.
अंबेबहार संत्रा-मोसंबी व मृगबहार डाळिंबात उघडी मिळाल्यावर फवारणी करावी.
भाजीपाला व फुलशेती
वांगी, मिरची, टोमॅटो यांची पुनर्लागवड किंवा गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत.
ओलाव्याची खात्री करून बियाद्वारे भाज्या (भेंडी, कारले, भोपळा, दोडका) लावाव्यात.
हुमणी अळीसाठी मेटारायझियम बुरशीचा वापर करावा.
काढणीस तयार झालेली भाजी व फुले वेळेत काढणी करून विक्री करावी.
पशुपालन सल्ला
जनावरांना स्वच्छ, कोरडे व पोषणमूल्य असलेले खाद्य द्यावे.
हिरवा कोवळा चारा उन्हात चांगला सुकवून द्यावा.
लसीकरण वेळेवर करावे.
पावसाळ्यात गोठ्यात स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
तुती रेशीम उद्योगासाठी सल्ला
चीनच्या तुलनेत उत्पादन वाढवण्यासाठी तुती पानांची गुणवत्ता व संगोपन तंत्र सुधारावे.
अधिकाधिक अंडीपूज घेऊन जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान टिकावता येईल.
मराठवाड्यात येत्या काही दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. पेरणीसाठी योग्य पावसाची प्रतीक्षा करत, तण व कीड नियंत्रणावर भर द्यावा. फळबागा, भाजीपाला व पशुपालनातही काळजी घेऊन उत्पादनात सातत्य ठेवावे, असे आवाहन तज्ज्ञ समितीने केले आहे.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
हे ही वाचा सविस्तर : Chia Market : चियाच्या दरात विक्रमी झेप; शेतकऱ्यांना मिळतोय हमखास नफा वाचा सविस्तर