Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Krushi Salla)
तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होईल, मात्र नंतर फारसा फरक राहणार नाही.
किमान तापमानातही पुढील काही दिवसांमध्ये स्थिरता राहील.(Krushi Salla)
सामान्य कृषी सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार, (ERFS) ९ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा जास्त, तर १० ते १६ ऑक्टोबरदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरीएवढे ते थोडे कमी, तर किमान तापमान किंचित जास्त राहील.
तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशी
* पावसाच्या पार्श्वभूमीवर फवारणी किंवा आळवणीची कामे उघाड बघून करावीत.
* सोयाबीन काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे.
* पावसाळी हवामानात कीड-रोगाचा प्रसार टाळण्यासाठी योग्य वेळी प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
पीक व्यवस्थापन सल्ला
सोयाबीन
काढणीस तयार झालेल्या सोयाबीनची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित साठवणूक करावी.
वाळल्यानंतर मळणी करावी जेणेकरून धान्याची गुणवत्ता टिकून राहील.
कापूस
आंतरिक बोंडसड नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% (२५ ग्रॅम) + स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
बाह्य बोंडसड रोखण्यासाठी पायराक्लोस्ट्रोबीन २०% किंवा प्रोपीकोनॅझोल २५% यांसारखी औषधे आलटून-पालटून वापरावीत.
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर ५ कामगंध सापळे लावावेत.
लाल्या रोगासाठी मॅग्नेशियम सल्फेट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात दोन फवारण्या घ्याव्यात.
तूर
ओलसर जमिनीत फायटोप्थेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
त्यासाठी मेटालॅक्झील एम + मॅन्कोझेब (५०० ग्रॅम/एकर) किंवा ट्रायकोडर्मा ५०० ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारणी व आळवणी करावी.
झाडे पिवळी पडत असल्यास मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (५० ग्रॅम) + १९:१९:१९ खत (१०० ग्रॅम) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खरीप ज्वारी
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (४ ग्रॅम/१० लिटर पाणी) किंवा स्पिनेटोरम (४ मिली/१० लिटर) फवारणी करावी.
हळद
२५ किलो नत्र प्रति हेक्टर सूक्ष्म सिंचनाद्वारे तीन ते चार हप्त्यांत द्यावे.
हरभरा व करडई
हरभरा पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचरा असलेली जमीन निवडावी.
करडईसाठी खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर पीक घ्यावे.
फळबाग व्यवस्थापन
संत्रा / मोसंबी : 00:52:34 (१.५ कि.ग्रा.) + जिब्रॅलिक ॲसिड (१.५ ग्रॅम) प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
डाळींब : 00:00:50 (१.५ कि.ग्रा./१०० लिटर पाणी) प्रमाणे फवारणी व अतिरिक्त फुटवे काढावेत.
चिकू : काढणी करून फळे सुरक्षित ठिकाणी साठवावीत.
भाजीपाला
काढणीस तयार पिके वेळेवर काढावीत.
जमिनीत वापसा असताना अंतर मशागती करून तण नियंत्रण करावे.
रब्बी भाजीपाला लागवडीची पूर्वतयारी सुरू करावी.
फुलशेती :
काढणीस तयार फुलपिकांची काढणी करून बाजारात विक्रीस पाठवावीत.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्यात पशुधनासाठी स्वच्छ व कोरडे खाद्य वापरावे.
जनावरांना जंतनाशक औषधे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार द्यावीत.
तुती व रेशीम उद्योग सल्ला :
तुती बागेत शेणखताऐवजी रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.
तुतीची पाने, फांद्या, कीटक विष्ठा वापरून कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत तयार करावे.
यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादनात वाढ होते.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)