Onion Nursery : नाशिक जिल्ह्यातील कांदा पट्ट्यात रब्बी कांद्याची लागवडीची तयारी सुरु आहे. सद्यस्थितीत रोपवाटिकेच्या नियोजनात शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी कांदा रोपवाटिका तयार करताना नेमकी सिंचन पद्धत कोणती निवडावी ही समस्या असते. याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात....
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन (सिंचन सुविधा)
- रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १० ते १५ सें.मी. उंच, १ ते १.२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत.
- त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत.
- तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
- वाफे तयार करताना १६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० ग्रॅम पालाश प्रति २०० वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत.
- रुंदीशी समांतर ५-७.५ सें.मी. अंतरावर रेघा पाडून १-१.५ सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे.
- पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे.
- नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे.
- तण नियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथेलीन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणात नेत्र द्यावे.
(नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिवसाकरिता स्थगित करव्यात.)
- ग्रामीण कृषी ,मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी