Agriculture News : पूर आणि अतिवृष्टीमुळे फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत पावसामुळे किंवा निचरा न झाल्यामुळे जमिनीत पाणी साचते. त्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही व मुळांची कुज (Root Rot) सुरू होते.
मुळे कुजल्यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात आणि झाडांमध्ये पोषणतत्त्वांची कमतरता जाणवते. पानगळ झाल्यावर प्रकाशसंश्लेषणाची क्षमता कमी होते आणि झाड कमजोर होते.
जास्त ओलाव्यामुळे झाडांवरील फुले व लहान फळगळ होऊन उत्पादन घटते. ओलसर वातावरणात डाउनी मिल्ड्यू, अँथ्रेक्नोज, मुळकुज, फूट रॉट, पावडरी मिल्ड्यू यांसारखे बुरशीजन्य रोग वेगाने वाढतात.
तसेच मिलीबग, पांढरी माशी, फळमाशी यांसारख्या किडींचाही प्रादुर्भाव वाढतो. परिणामी झाडांचे एकूण स्वास्थ्य बिघडते आणि फळांची गुणवत्ता व उत्पादन दोन्ही घटते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी तात्काळ व नियोजनबद्ध उपाययोजना केल्यास नुकसान काही प्रमाणात कमी करता येते. यात प्रामुख्याने -
- पाण्याचा निचरा करणे (झाडांना श्वसनासाठी ऑक्सिजन मिळावा म्हणून)
- माती सैल करणे व सेंद्रिय खतांचा वापर (मातीतील सूक्ष्मजीव कार्यशील ठेवण्यासाठी)
- रोगकिड व्यवस्थापन (बुरशीनाशके व कीडनाशके योग्य प्रमाणात फवारणे)
- सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा (झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन इ. द्रव्ये देणे)
- दीर्घकालीन निचरा व्यवस्था (भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी)
द्राक्ष
समस्या : पाणी साचल्याने मुळे कुजणे - डाउनी मिल्ड्यू, ॲथ्रेक्नोज रोग, फळगळ, पानगळ
तात्काळ पाण्याचा निचरा करावा. झाडाभोवती माती सेल करणे.
मेटॅलॅक्झिल (0.1%) + मॅन्कोझेब (0.25%) फवारणी करावी. ०.५ टक्के युरिया फवारणी ट्रायकोडर्मा + शेणखत मुळांजवळ टाकावे.
डाळिंब
समस्या : मुळकुज, ॲप्रेंक्नोज, तेलकट डाग रोग व बुरशीजन्य रोग, पानगळ, फळगळ.
उपाय : रोगट फांद्या काढून जाळाव्यात कॉपर ऑक्सीक्लोराईड (0.25%) किंवा कार्बेन्डाझीम (0.1%) फवारणी २% डीएपी + सूक्ष्म अन्नद्रव्ये (Zn, Mg, Fe) फवारणी पाणी साचू नये म्हणून निचरा व्यवस्था सुधारावी.
आंबा
समस्या : मुळांजवळ कुज रोग
उपाय : १ टक्के बोर्डो मिश्रण फवारणी ट्रायकोडर्मा + शेणखत मुळांजवळ द्यावे.
२ टक्के डीएपी / १ टक्के पोटेशियम नायट्रेट फवारणी करावी.
झाडांभोवती पाणी न थांबता वाहून जाईल, अशी निचरा व्यवस्था करावी
पपई
समस्या : पानगळ, फळगळ, मुळकुज व व्हायरस रोगांचा प्रादुर्भाव, झाडे पडणे.
उपाय : पडलेल्या झाडांना आधार झिंक सल्फेट बोरेक्स मिश्रण फवारणी करावी.
पूरानंतर बियाणे व रोपांचे पुनर्लागवड नियोजन कॉपर ऑक्सीक्लोराईड (0.25 टक्के) फवारणी करावी.
या उपाययोजना केल्यास पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेली फळबाग पुन्हा उत्पादनक्षम होऊ शकते.
- कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, जि. नाशिक
Read More : अतिवृष्टीमुळे कांदा आणि टोमॅटो पिकामध्ये करावयाच्या उपाययोजना, वाचा सविस्तर