जळगाव : सततच्या ढगाळ हवामानामुळे रावेर, यावल, जळगाव आणि चोपडा तालुक्यांमधील केळी पिकांवर 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जरी या पावसामुळे खरीप पिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी, ढगाळ वातावरण असेच कायम राहिल्यास करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
करपा रोखण्यासाठी काय कराव्यात उपाययोजना ?
मे-जून महिन्यांतील वादळी पावसामुळे केळी बागांचे आधीच मोठे नुकसान झाले होते. त्यात आता 'करपा'चा धोका वाढला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बुरशी नाशकांची फवारणी करावी. तसेच, बागेत योग्य वायुवीजन राहील याची काळजी घ्यावी.
केळीच्या दरात मोठी घट
एकीकडे रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी केळीचे दर वाढले होते आणि श्रावण महिन्यात ते आणखी वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, याच महिन्यात केळीच्या दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची घट झाली आहे.
जो भाव २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होता, तो आता १८०० ते २००० रुपयांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे, व्यापारी अजून भाव कमी करून शेतकऱ्यांकडून केवळ १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दरानेच केळी खरेदी करत आहेत. गुजरात राज्यातील मालाला मागणी असल्याने, महाराष्ट्रातील केळीच्या मालाची मागणी घटल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे.