कोकणामध्ये विविध प्रकारची फळझाडे आढळतात. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या कोकणात मोठ्याप्रमाणात बागा आहेत. त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची.
जमीन व हवामान
पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन 'कोकम' लागवडीसाठी उपयुक्त आहे. या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य आहे.
अभिवृद्धी
कोकमामध्ये रोपापासून लागवड केल्यास ५० टक्के नर व ५० टक्के मादी झाडे निघतात. खात्रीशीर मादी झाडे मिळविण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाने मृदकाष्ठ पद्धत विकसित केली आहे. लागवडीत ९० टक्के मादी व १० टक्के नरांची झाडे ठेवावीत.
सुधारित जाती
कोकण अमृता व कोकण हातीस या विद्यापीठाने सुधारित जाती विकसित केल्या आहेत.
१) कोकण अमृता
या जातीची फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असून, उत्पन्न भरपूर (१४० किलो/झाड) देणारी आहेत. पावसाळ्यापूर्वी उत्पन्न मिळत असल्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
२) कोकण हातीस
विद्यापीठाने २००६ मध्ये ही मादी जात कोकणामध्ये लागवडीसाठी शिफारस केली आहे. या जातीची फळे मोठी, जाड सालीची व गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून १०व्या वर्षी १५० किलो फळे मिळतात.
हे मादी झाड असल्यामुळे परागीकरण व फलधारणेसाठी कोकणाचे 'नर' कलम किंवा ५ ते ६ टक्के रोपे बागेत लावणे गरजेचे आहे.
लागवड
- लागवडीसाठी मे महिन्यात सहा बाय सहा मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सेंटिमीटर आकाराचे खड्डे काढावेत.
- पावसाळ्यापूर्वी चांगली माती, एक घमेले कुजलेले शेणखत व १.० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
- रोपांचे किंवा कलमांचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्यात टाकावे.
- पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्यात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी दोन रोपे किंवा एक कलम लावावे.
- कलमे लावल्यानंतर त्यांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करावे.
- कलमाच्या जोडाखाली खुंटापासून वारंवार येणारी फूट लगेच काढून टाकावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते.
- पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सावली करावी.
- झाडांभोवती वाळलेले गवत वेळोवेळी काढून टाकावे.
- रोपांपासून लागवड केलेल्या बागांना ६ वर्षांनी मोहर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागते.
काढणी व उत्पन्न
- रोपांची लागवड केलेल्या झाडाला सहा वर्षांनंतर फळे धरू लागतात.
- कलमांपासून पाचव्या वर्षांपासून फळे घ्यावीत.
- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुले येण्यास सुरुवात होते. मार्च ते जून महिन्यांपर्यंत फळे काढणीसाठी तयार होतात.
- हिरव्या रंगाची कच्ची फळे पिकल्यानंतर लाल होतात. पूर्ण लाल झाल्यानंतर फळे काढावीत.
- चांगल्या वाढलेल्या व योग्य वीण राखलेल्या झाडांपासून प्रत्येक वर्षी १०० ते १५० किलोपर्यंत फळे मिळतात.
- कोकम फळाचे अधिक व लवकर उत्पादन मिळविण्यासाठी तीन टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या कराव्यात.
- पहिली फवारणी फळधारणेवेळी करावी.
अधिक वाचा: Mango Rejuvenation जुन्या आंबा बागेचं उत्पादन कसं वाढवाल, असे करा व्यवस्थापन