कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. मोहोर येण्यापासून ते फळ काढणीपर्यंत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात.
योग्य वेळी काळजी घेतल्यास नुकसान कमी होऊन उत्पादन वाढवता येते. त्यासाठी आंबा मोहोर संरक्षण करण्याचा सल्ला कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी दिला आहे.
रोग व किडींचा प्रादुर्भाव
◼️ पावसाळ्यानंतर मुळांना पाण्याचा ताण व त्यानंतर १० ते १५ दिवस १२ ते १५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान राहिल्यास परिपक्व पालवीवर चांगला मोहोर येतो. मात्र, या काळात तुडतुडे व फुलकिडी यांचा प्रादुर्भाव होतो.
कसे कराल व्यवस्थापन
◼️ थंड, कोरडे वातावरण व रात्रीची जास्त आर्द्रता असल्यास भुरी रोग वाढतो. मोहोर व पानांवर राखेसारखी पावडर दिसून मोहोर सुकतो व फलधारणा होत नाही. संरक्षण उपाय म्हणून बागेत गवत वाढू देऊ नये.
◼️ तुडतुडे आणि फुलकिडी यांचा प्रादुर्भाव दिसताच प्रती एक लिटर पाण्यात डेल्टामेथ्रिन १ मिली किंवा पुढील फवारणीस लॅमडा सायहॅलोथ्रिन ०.६ मिली अथवा आझाडिरॅक्टिन ३ मिली वापरावे.
◼️ भुरी रोगाच्या नियंत्रणसाठी मोहोर निघताना गंधक २ ग्रॅम फवारावे. ढगाळ वातावरणात १५-२० दिवसांच्या अंतराने हेक्झाकोनाझोल ०.५ मिली किंवा कार्बेन्डाझिम व मॅनकोझेब १ ग्रॅम फवारणी करावी.
◼️ रस शोषक किडी तुडतुडे आणि फुलकिड नियंत्रणासाठी वर्टीसिलीअम लेकानी ५ ग्रॅम उपयुक्त ठरते. तसेच फुलकिडीसाठी एकरी ५० ते १०० निळे चिकट सापळे लावावेत.
◼️ ढेकणाची लागण दिसताच वर्टिसिलीअम लेकानी ५ मिली फवारावे. क्लोरपायरीफॉस २ मिली आणि फिश ऑइल फवारणी करावी.
◼️ आंबा हे पर-परागीभवनाचे पीक असून मधमाशा परागीभवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
◼️ मोहोर फुलण्यापासून ते फळधारणेपर्यंत २० ते २५ दिवस रासायनिक कीटकनाशके टाळावीत, बागेत मधमाशीच्या पेट्या ठेवाव्यात. यामुळे फलधारणा सुधारून ३० ते ३५ टक्के उत्पादन वाढ शक्य होते.
फळमाशीमुळे होते सर्वांत जास्त आंब्याचे नुकसान
◼️ आंबा फळवाढीच्या अवस्थेत फळमाशी व पिठ्या ढेकूण (मेलिबग) या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
◼️ फळमाशी मादी फळाच्या सालीखाली अंडी घालते.
◼️ त्यातून तयार झालेल्या अळ्या फळाचा गर खात असल्याने फळे कुजतात व विक्रीयोग्य राहत नाहीत.
◼️ या किडीमुळे सुमारे ३० ते ४० टक्के नुकसान होते.
◼️ त्याच्या नियंत्रणासाठी जानेवारीपासून बागेत मिथाईल यूजेनॉलयुक्त फळमाशी सापळे एकरी ४ लावावेत.
◼️ फळांना पेपर बॅग लावाव्यात व खाली पडलेली फळे त्वरित गोळा करून नष्ट करावीत.
अधिक वाचा: पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफीचा फायदा; प्रत्येक कर्ज प्रकरणामागे शेतकऱ्यांची किती रुपयांची बचत
