मागील भागात आपण करटुले या भाजीपाला पिकाचे वंशपरिचय, पोषणमूल्य, औषधी गुणधर्म, त्याचे बाजारातील महत्त्व व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध संधी यांचा सविस्तर अभ्यास केला.
आजच्या भागात आपण पाहणार आहोत करटुले लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान, लागवडीची वेळ, पेरणी, लागवड तंत्र, खते, पाणी व्यवस्थापन, परागीभवन व फळधारणेची माहिती.
लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान
करटुले विविध प्रकारच्या जमिनीत उगवू शकते परंतु ५.५ ते ७.० सामू असलेली वालुकामय गाळाची (sandy loam) जमीन यासाठी सर्वोत्कृष्ट ठरते. सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आणि चांगली निचऱ्याची क्षमता असलेली जमीन लागवडीसाठी उपयुक्त आहे.
तसेच उष्ण व दमट हवामान करटुले लागवडीसाठी पूरक ठरते. हे पीक २५–३५°C तापमानात व ६००–४५०० मिमी वार्षिक पर्जन्यमानात उत्तम वाढते.
पेरणीची योग्य वेळ
करटुले पिकाचा कालावधी साधारणतः ११५–१२५ दिवसांचा असतो. सामान्यतः जून–जुलैमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी केली जाते. ज्यातून पहिली बाजारात विक्री योग्य फळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तयार होतात. साधारणतः चार तोडणीनंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पीक परिपक्व होते.
दुसऱ्या वर्षापासून पुन्हा लागवडीसाठी बिया किंवा कंद पेरण्याची गरज नसते. कारण कंदांमधून नवीन उगवण मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होते. पहिली तोडणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात होते. एकच कंद ४–५ वर्षे लागवडीसाठी वापरता येतो.
करटुले लागवड तंत्र
करटुलेची लागवड बियांद्वारे करता येते परंतु त्यातून उगवलेली रोपे एकसारखी राहत नाहीत. त्यामुळे कंद किंवा खोडाच्या कलमांद्वारे केलेली शाकीय लागवड अधिक फायदेशीर ठरते कारण त्यातून खरेखुरे व एकसंध उत्पादन मिळते.
• बियांची आवश्यकता : एका हेक्टरसाठी सुमारे २.५ ते ५.० किलो बिया लागतात. उगवण क्षमता कमी असल्यामुळे व नर : मादी प्रमाण राखणे आवश्यक असल्यामुळे अधिक बियांची गरज भासते.
• कंद किंवा खोडाच्या कलमांद्वारे लागवड : जर नर व मादी रोपे आधी ओळखलेली असतील, तर २५००–२६५० रोपे (२२००–२३०० मादी व ३००–३५० नर) एका हेक्टरसाठी पुरेशी ठरतात.
जमीन तयारी व पेरणी
• जमीन समतल करून नांगरट व वखरणी करावी. शेवटच्या नांगरटपूर्वी १५-२० टन प्रति हेक्टर शेणखत टाकल्यास फळउत्पादन चांगले होते.
• प्रत्येक वेलीकरिता ५०×५०×५० से.मी. आकाराचे खड्डे २ मी × २ मी अंतराने तयार करावेत.
• खड्डे माती : वाळू : कुजलेले शेणखत (२:१:१) या मिश्रणाने भरावेत.
• सुरुवातीला रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
खत व्यवस्थापन
• सेंद्रिय खत : १५-२० टन/हेक्टर शेणखत शेत तयार करताना मिसळावे.
• रासायनिक खते : नत्र, स्फुरद व पालाश १००:६०:४० कि.ग्रॅ./हेक्टर या प्रमाणात द्यावेत.
• लागवडीपूर्वी पूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. नायट्रोजनचे अर्धे प्रमाण वेलींच्या वाढीच्या वेळी व उर्वरित फुलधारणेपूर्वी द्यावे.
टीप : ८ मादी झाडांमागे १ नर झाड या प्रमाणात लागवड करावी.
तण नियंत्रण
करटुले पिकामध्ये तण आढळल्यास नियमितपणे तण काढणी करावी. याची मुळे उथळी असल्यामुळे हाताने तण काढणे (hand weeding) किंवा खुडणीने तण काढणे (hand hoeing) हे उपाय सर्वोत्तम ठरतात.
पाणी व्यवस्थापन
• बिया किंवा कंद लावल्यानंतर त्वरित पाणी द्यावे. नंतर गरजेनुसार पाणी द्यावे.
• पावसाचा खंड पडल्यास आठवड्यातून १-२ वेळा पाणी द्यावे.
• पावसाळ्यात मात्र पाणी साचू नये याची विशेष दक्षता घ्यावी अन्यथा वेली कुजतात.
आधार देणे
करटुले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे त्यास आधार देणे आवश्यक असते. यासाठी लाकूड, बांबू किंवा लोखंडी तारांचा वापर करून एकेक काठी किंवा मंडप पद्धत वापरावी. यामुळे वेलींची वाढ सुकर होते आणि फळउत्पादनात वाढ होते.
फुलोरा, परागीभवन व फळधारणा
• फुलोऱ्याची सुरुवात : (१) रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर : ५०–६० दिवसांत (२) कंद लागवड केल्यानंतर : ३०–४० दिवसांत.
• Anthesis (फुलांची उघडझाप) संध्याकाळच्या वेळेस होते.
• हाताने परागीभवन केल्यास फळधारणेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. तसेच योग्य परागीभवन न झाल्यास उत्पादन घटते.
• त्यामुळे शक्य तितक्या प्रमाणात कृत्रिम परागीभवन करून फळउत्पादन व नफा वाढवावा.
• विशेष लक्ष द्यावे की, करटुले हे द्विलिंगी (dioecious) पीक असल्यामुळे शेतात नर : मादी यांचे योग्य प्रमाण राखणे अत्यावश्यक आहे. यामुळे फुलोरा, परागीभवन व फळधारणा या सर्वांवर सकारात्मक परिणाम होतो.
क्रमश:
डॉ संतोष चव्हाण
विषय विषेशज्ञ (उद्यान विद्या)
डॉ प्रवीण चव्हाण
विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार)
संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी नांदेड.
हेही वाचा : (भाग -१) करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे