lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?

रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?

How to do onion seed production in rabi season? | रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?

रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?

कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते.

कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

भाजीपाला पिकांमध्ये कांदा हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. जगामध्ये भारताचा कांदा उत्पादक देशांमध्ये प्रथम क्रमांक आहे. गेल्या काही वर्षामध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरीही इतर देशांशी तुलना करता भारतातील कांद्याची सरासरी उत्पादकता खूप कमी म्हणजेच १६-१८ टन/हेक्टर असल्याचे आढळते. कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते.

शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, ही संत तुकारामांची उक्ति इतर फळे व भाज्यांमध्ये प्रत्यक्षात खरी झाली आहे. परंतु कांद्याच्या बाबतीत त्याची प्रचिती येणे बाकी आहे. यातील मोठा अडसर म्हणजे शेतकरी वापरत असलेले पारंपारिक वाण व बिजोत्पादनाचे नियम न पाळता स्वतःच त्याचे बिजोत्पादन करणे हे होय. कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढवण्यास पारंपारिक व कमी उत्पादन देणाऱ्या जातींच्या ऐवजी शिफारस केलेल्या सुधारित जातींचा सहभाग महत्वपूर्ण आहे. एक हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यासाठी ७ ते ८ किलो बी लागते. या हिशोबाने देशात १६.२० लाख हेक्टर कांदा लागवडीसाठी अंदाजे ११५०० टन बियाण्यांची आवश्यकता आहे. 

कांदा बिजोत्पादनाकरिता विकसित जाती
कांद्यांमध्ये हंगामानुसार आणि रंगानुसार अनेक जाती आहेत. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा डार्क रेड, भीमा रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाईट रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्वेता आणि भीमा सफेद या कांद्याच्या दहा जाती विकसित केल्या आहेत. बिजोत्पादन करताना उत्तम प्रतीच्या कांद्यांची निवड करणे आवश्यक असते.

हवामान आणि जमीन
कांदा पिक हे बिजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. पराग सिंचनाच्या काळात तापमान ३५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे वाढले तर मधमाशांचा वावर कमी होतो. परिणामी बिजोत्पादन कमी होते. तापमानाव्यतिरिक्त बिजोत्पादनासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश सुद्धा आवश्यक  असतो. ढगाळ हवामान किंवा पाऊस यांमुळे रोगांचे प्रमाण वाढते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान यामुळे फलधारणा चांगली होते. मध्यम ते भारी जमिनीत कांदा बिजोत्पादन चांगले होते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीत उत्पादन चांगले येत नाही. तसेच हलक्या किंवा मुरमाड जमिनीत बिजोत्पादन घेऊ नये. अशा जमिनीत फुलांचे दांडे कमी निघतात आणि बी कमी तयार होते. म्हणून पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत कांदा बिजोत्पादन करणे फायदेशीर ठरते.

अधिक वाचा: विद्राव्य खतांच्या वापरासाठी फायदेशीर फर्टिगेशन तंत्रज्ञान

रब्बी हंगामातील जातींचे बिजोत्पादन
रब्बी हंगामातील जातींची रोपे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात लावली जातात. एप्रिल-मे महिन्यात कांदे काढून वाळवून ते चाळीत भरले जातात. ऑक्टोंबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बिजोत्पादनासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत कांद्याची साठवण हा गुणधर्म आपोआप प्रत्येक पीढित वृद्धिंगत होत जातो. कांद्यांना जवळ-जवळ ५ ते ६ महिने पुरेशी विश्रांती मिळत असल्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात व बियांचे उत्पादन खरीपाच्या जातीपेक्षा अधिक मिळते.

जमिनीची निवड आणि रान बांधणी
उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून तापू द्यावी. पावसाळ्यापूर्वी पाळी घालून हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत शेवटच्या पाळी अगोदर पसरवून नंतर पाळी घालून मिसळून घ्यावे. कंद लावण्यासाठी ४५ सेमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात व पाणी देण्यासाठी ४ ते ५ मि. अंतरावर आडवे पाट टाकून ४ ते ५ सऱ्याचे वाफे बांधून घ्यावेत. ठिबक सिंचनावर बिजोत्पादन करावयाचे असल्यास १ मीटर अंतरावर लॅटरल काढावेत. ५० सेमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात. प्रत्येक सरीच्या तळाशी कांदा ठेवून एका आड एक वरंबा सपाट करावा व त्यावर लॅटरल पसरवून घ्यावी.

जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण (Isolation)
परागकण गोळा करण्यासाठी मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर किंवा फुलांच्या गुच्छावर भ्रमण करत असतात. या प्रक्रियेत त्यांच्या पायांना परागकण चिकटून त्याद्वारे दुसऱ्या फुलावर परागसिंचन होते यालाच परपरागीभवन (cross -pollination) असे म्हणतात. माशांचा वावर जवळपास दीड ते दोन कि.मी. परिसरात होत असतो. दोन जाती बिजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. यामुळे बियाण्यात भेसळ येते. शेतकऱ्यांना आवश्यक व महत्वाचे गुण त्या जातींमधून कमी होत जातात. जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बिजोत्पादन करतेवेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत जरुरीचे आहे. याशिवाय बिजोत्पादनाच्या शेजारील कांदा लागवडीतील डेंगळे फुले उमलण्याअगोदर तोडणे महत्वाचे आहे. अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते.

लागवडीसाठी मातृकांद्याची निवड व लागवड
कांदा बिजोत्पादनातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लागवडीसाठी मातृकांद्याची निवड हा होय. प्रत्येक पिढीतील चांगला कांदा बाजारात विकला जातो व लहान, जोडकांदे किंवा आकार व रंगहिन कांदे बिजोत्पादनासाठी वापरले जातात. जातीपरत्वे कांद्याचा रंग व आकार पाहून कांदे निवडावेत. कांदे आकाराने गोल व मोठे असावेत. चपटे, जाड मानेचे, बुडाचा 'भाग आत दबलेले कांदे लागवडीसाठी निवडु नयेत. तसेच कांद्याचा रंग जातीपरत्वे गडद व आकर्षक व एकसारखा असावा. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असावेत. वजन ७० ते ८० ग्रॅमच्या दरम्यान असावे व जाडी ४.५ ते ६.० सेमी. इतकी असावी. निवड केल्यानंतर प्रत्येक कांद्याचा वरचा एक तृतीयंश भाग कापून काढावा व कापल्यानंतर केवळ एक डोळ्याचे कांदे निवडावेत. कांदे निवडण्यापूर्वी ते चांगले सुकवलेले व विश्रांती मिळालेले असावेत. सालपटे निघालेले, काजळी आलेले किंवा कोंब आलेले किंवा सडलेले कांदे बिजोत्पादनासाठी अजिबात वापरू नयेत. कापून तयार केलेले कांदे १०० लीटर पाण्यात २०० मिली कार्बोसल्फॉन व २०० ग्रॅम बाविस्टिन मिसळून तयार केलेल्या द्रावणात अर्धा तास बुडवून लावावेत.

अधिक वाचा: फायदेशीर चंदन लागवडीचे तंत्रज्ञान

साधारणपणे ६.५ ते ७.० सामू असणारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी काळी मृदा कांदा बिजोत्पादनासाठी निवडावी. सरी वरंब्यावर लागवड करताना सरीच्या एका बाजूवर ३० सेमी. अंतरावर तयार केलेले कांदे लावावेत. कंद मातीमध्ये पूर्ण झाकले जातील अशा पद्धतीने लावावेत. ठिबक सिंचनावर लागवड करावयाची झाल्यास ५० सेमी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात दोन सरींच्या तळाशी २० सेमी. अंतरावर कांदे ठेवावेत. एक सरी मोकळी ठेवावी. कांदे ठेवलेल्या सरीचा माथा सपाट करावा त्यामुळे सरींच्या तळाशी ठेवलेले कांदे मातीने चांगले झाकून जातात शिवाय ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवण्यास सपाट जागा तयार होते. एका जोड ओळीसाठी एक ठिबक सिंचनाची नळी वापरता येते. सर्वसाधारणपणे मध्यम आकाराचे कांदे वापरले तर हेक्टरी २५ ते ३० क्विंटल कांदे बियाणे म्हणून लागतात.

पाणी नियोजन
बिजोत्पादनासाठी कांदे लावल्यानंतर पहिले पाणी हलके द्यावे. पहिल्या पाण्यानंतर लगेच कोंब फुटून निघतात. उघडे पडलेले कांदे मातीने झाकून घ्यावेत आणि दुसरे पाणी द्यावे. कांदा बिजोत्पादन सर्वसाधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेत असल्यामुळे दोन पाळ्यांमधील अंतर ८ ते १० दिवस ठेवावे. प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे. कांदा पिकाची मुळे १५ ते २० सें.मी. खोल जातात. तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले तर कंद सडतात. हलक्या जमिनीत पाणी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे. पाणी कमी पडल्यास बी वजनाने हलके राहते आणि त्याची उगवण क्षमता कमी होते. ठिबक सिंचनावर बिजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. एक मीटर अंतरावर ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवून नळीच्या दोन्ही बाजूंनी कांदा लागवड करून पाणी देता येते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत होते, पाणी देणे सुलभ होते, शिवाय तणांचे प्रमाण सुद्धा कमी राहते.

भर खते व वरखते
चांगले बिजोत्पादन घेण्यासाठी संतुलीत खतांचा वापर आवश्यक आहे. कांदा लागवडीच्या २० ते २५ दिवस अगोदर २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत पसरवून नांगरट करावी. शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होवू शकतो. याचबरोबर रासायनिक खत १०० किग्रॅ. नत्र, ५० कीग्रॅ. स्फुरद व ५० किग्रॅ. पालाश या वरखतांची शिफारस करण्यात आली आहे. हे खत कोणत्याही रासायनिक मिश्र खतातून देता येते. कांदा लागवडीच्या आधी संपूर्ण स्फुरद व पालाश व निम्मे नत्र जमिनीत चांगले मिसळावे. उरलेले ५० किग्रॅ. नत्र दोन भागात विभागून द्यावे. पहिला भाग कंद लावल्यानंतर ३० दिवसांनी व दुसरा उरलेला भाग लागवडीनंतर ५० दिवसांनी द्यावा. कांदा पिकास गंधक, तांबे, लोह, जस्त, मॅगनिज, बोरॉन आदि सूक्ष्म द्रव्यांची गरज असते. गंधकाच्या कमतरतेसाठी हेक्टरी ५० किलो गंधक मिश्रखतासोबत जमिनीत मिसळावे. अन्य सूक्ष्म द्रव्यांसाठी झिंक सल्फेट ०.१ टक्के, मँगनीज सल्फेट, कॉपर सल्फेट ०.१ टक्के (१ ग्रॅम पावडर प्रति लिटर पाण्यात), फेरस सल्फेट ०.२५ टक्के, बोरिक अॅसिड ०.१५ टक्के अशा प्रमाणात पिकांवर फवारावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी कांदे लावल्यानंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान करावी व फवारणी करताना त्यात चिकट द्रावण ०.६ मि.ली. प्रति लीटर या प्रमाणात अवश्य वापरावे. दांड्यावरील फुले उमलल्यानंतर फवारणी करू नये.

अयोग्य झाडांची काढणी (रोगिंग)
कांदा बिजोत्पादन करताना वेळेवर अयोग्य रोपांचा नाश करणे आवश्यक आहे. त्यामुळे जातींची शुद्धता टिकून राहते. कांदा लागवडीनंतर फुलोरा येण्याआधी विलगीकरण क्षेत्रात लावलेल्या रब्बी कांदा पिकातील डेंगळे काढून टाकावेत. तसेच बिजोत्पादन पिकात वेगळ्या प्रकारची झाडे दिसून आल्यास ती मुळासकट उपटून काढावीत. कमजोर, रोगट व पिवळी झाडे उपटून नष्ट करावीत. फुलोरा येण्याचे वेळी फुलांच्या दांड्याची वाढ असमान असेल तर अशी वेगळी झाडे उपटून काढावीत. तसेच पुन्हा आजूबाजूच्या शेतात इतर मुख्य कांदा पिकात आलेल्या डेंगळ्याचे दांडे काढणे आवश्यक आहे. यानंतर बी पक्व होताना गोंड्याचा आकार व रचना वेगळी असणारी झाडे उपटून काढावीत.

पूरक पराग सिंचन
कांद्याचे परागीभवन प्रामुख्याने मधमाशांद्वारे होते. पराग सिंचनाचे काम अधिक चांगले व्हावे म्हणून फुले उमलल्यानंतर नैसर्गिकरित्या मधमाशा कांदा फुलावर येऊ लागतात. परंतु अलीकडे जंगलतोड व कीडनाशकांच्या वाढता वापर यामुळे मोहळांची संख्या कमी झाली आहे ज्याचा परिणाम बिजोत्पादनावर होत आहे. मधमाशांची कार्यक्षमता टिकून ठेवायची असेल तर कांद्याची फुले उमलल्यानंतर कोणत्याही कीडनाशकाची फवारणी करू नये अन्यथा नैसर्गिकरित्या माशा येत नाहीत. कांदा पिकासोबत गाजराचे बी किंवा कान्हळ्याचे बी घेतले तर मधमाशा मोठ्या प्रमाणात शेताकडे आकर्षित होतात. बिजोत्पादनासाठी पूरक पराग सिंचन व्यवस्था करताना एकरी दोन ते तीन मधमाशीच्या पेट्या ठेवल्यामुळे बियाण्यात ८० ते १०० टक्के वाढ होते असे आढळून आले आहे. त्यासाठी मधमाशांच्या एकरी दोन ते तीन पेट्या शेतात फुले उमलल्या नंतर ठेवाव्या लागतात. मधमाश्यांच्या पेटीवर सावली करणे तसेच पाण्यासाठी उथळ भांड्यांचा किंवा ओल्या फडक्याचा वापर करणे गरजेचे आहे.

अधिक वाचा: अशी वाढवा आपल्या कांद्याची बाजारातली किंमत

कापणी, मळणी आणि साठवण
कांद्याच्या गोंड्यात एकाच वेळी सर्व बी पक्व होत नाही. तसेच फुलांचे दांडे निघण्याचा काळ एकसारखा नसतो. म्हणून एका झाडात बी वेगवेगळ्या काळात परिपक्व होते. सामान्यतः बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्याचा रंग तपकिरी होतो व बियांचे आवरण (कॅप्सूल) फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात असे ५ ते १० टक्के कॅप्सूल फाटून बी दिसायला लागले तर समजावे बी परिपक्व झालेले आहे व असा गोंडा काढून घ्यावा. गोंडे जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत.

सामान्यतः ३ ते ५ वेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते. सकाळच्या वेळी काढणी करणे फायदेशीर राहते जेणेकरून वातावरणातील आर्द्रता व गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्याने बी गळून पडण्याची भीती नसते. गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. गोंडे सुकवताना ते ३ ते ४ वेळा वरखाली करावेत. गोंडे जर चांगले सुकले नाही तर बी मळणी अवघड होते व बियांवर सालपट चिटकून राहिल्याने त्याची भौतिक शुद्धता कमी होते. चांगले सुकलेल्या गोंड्यामधून बी हळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वछ करावे. हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या साहाय्याने अथवा प्रतवारी यंत्राच्या सहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.

मळणी केलेल्या बियांत १० ते १२ टक्के आर्द्रता असते म्हणून स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये सामान्यत ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता नसावी. अशा बियांचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त राहिला तर बियांची उगवण क्षमता कमी होते.
बी जास्त दिवस साठवण्यासाठी आर्द्रता रोधक पिशव्यांचा वापर करावा, परंतु अशा पिशवीत बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्के पेक्षा जास्त आद्रता नसावी. बियांच्या पॅकिंगसाठी हवाबंद टीनच्या डब्यांचा पण वापर केला जातो. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले तर बी जास्तकाळ टिकू शकते. पॅकिंग केलेल्या बियांच्या पाकिटावर अथवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवण क्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करावी.

डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे, प्रांजली घोडके आणि डॉ. विजय महाजन
भाकृअनुप - कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे

Web Title: How to do onion seed production in rabi season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.