गवार अनेकांच्या पसंतीची भाजी असून, गवारीच्या गवारीच्या हिरव्या शेंगांची भाजी खाण्यासाठी वापरली जाते. गवारीपासून डिंक, जनावरांचा हिरवा चारा, हिरवळीची खते म्हणून वापर केला जातो. हे पीक व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.
गवारीच्या शेंगांमध्ये अ, व आणि क जीवनसत्त्वे तसेच लोह, फॉस्फरस, प्रथिने, चुना, मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. गवार खाल्ल्याने पोटाच्या समस्या, त्वचेच्या समस्यासुद्धा दूर होतात. रक्तदाबासह मधुमेहसुद्धा नियंत्रित राहतो.
आवश्यक जमिन
- गवार हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये चांगले येते. मात्र, जास्त उत्पादन घेण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ जास्त असणारे मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी योग्य ठरते.
- गवारीची लागवड पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत करू नये, त्यामुळे उत्पन्न कमी येते. हलक्या जमिनीमध्ये शेणखत दिल्यानंतर पीक उत्तम येते.
विविध जाती
सुरती गवार, पुसा नवबहार, पुसा सदाबहार या सुधारित जातींसह देशी वाणाची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते.
पूर्वमशागत
- लागवड करण्याच्या अगोदर निवडलेली जमीन नांगरून घ्यावी आणि त्याचवेळी जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये शेणखत किंवा घन जीवामृत घालावे.
- मशागत करताना सर्व ढेकळे फोडून घ्यावे आणि कोळप्याच्या साहाय्य्याने दोन ते तीन पाळ्या मारून जमीन एकसारखी करून घ्यावी.
लागवड कधी व कशी कराल?
- गवारीची लागवड ही खरीप किंवा उन्हाळी हंगामामध्ये केली जाते.
- गवारीची लागवड ही ४५ बाय १५ सेंटीमीटर किंवा ३० बाय १५ सेंटीमीटर या अंतरावर सरीवर केली जाते.
- सरी वरंब्या वर प्रत्येक ठिकाणी दोन बिया टोकाव्या.
- बिया टोकण्याच्या अगोदर जर दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या तर उगवण चांगली होते.
पाणी व्यवस्थापन
- लागवडीपूर्वी जमिनीला हलके पाणी द्यावे, वापसा आल्यानंतर शक्यतो लागवड करावी. त्यामुळे गवारीची उगवण चांगली होते.
- लागवडीनंतरही हलके पाणी द्यावे. जमिनीचा मगदूर बघून पाण्याचे योग्य नियोजन करावे.
- फुले आल्यानंतर शेंगांचा बहार पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- तणाचा बंदोबस्त करण्यासाठी प्लास्टिक पेपरचे मल्चिंग करावे. कीडरोगाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले येते.
काढणी व उत्पादन
- गवारीच्या शेंगा गुच्छाने लागतात भाजीसाठी हिरव्या कोवळ्या; परंतु वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी केली जाते.
- तोडणीसाठी उशीर झाल्यास शेंगा जून होतात. त्यासाठी वेळोवेळी तोडणी आवश्यक आहे.
- बाजारात कोवळ्या शेंगांना मागणी असल्याने ३ ते ४ दिवसांनी तोडणी करावी.
- प्रत्येक वाणानुसार उत्पादन वेगवेगळे येते सरासरी हेक्टरी पाच ते सहा टन उत्पादन मिळते. गवारीला दरही चांगला मिळतो.
अधिक वाचा: Kakadi Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचं काकडी पिक ठरतंय फायदेशीर; कशी कराल लागवड