ज्वारी आता फक्त भाकरीसाठी नव्हे तर इतर अनेक मूल्यवर्धित पदार्थासाठी वापरली जाते जसे लाह्या, पापड, पोहे, इडली रखा, हुरडा इत्यादी.
ज्वारी पिकाच्या दुधाळ अवस्थेतेनंतर ज्वारीचे चवदार, मऊ व गोडसर दाणे भाजून खाण्यासाठी वापरले जातात त्याला हुरडा असे म्हणतात. या वाणांची वैशिष्ट्ये म्हणजे दुधाळ अवस्थेमध्ये त्यांच्या कणसातील दाणे सहजरित्या वेगळे करता येतात.
हुरडा ज्वारीचे सुधारित वाण
१) परभणी वसंत (पीव्हीआरएसजी १०१)
◼️ हा वाण २०२१ साली वनामकृवि, परभणी विद्यापीठातून हुरडा लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
◼️ या वाणापासून प्रति हेक्टरी हुरड्याचे ३२-३५ क्विं. आणि कडब्याचे हेक्टरी १२५-१३० क्विं. उत्पादन मिळते.
◼️ हा वाण खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास मध्यम सहनशील आढळून आला आहे.
◼️ हा वाण ९०-१०० दिवसांत हुरडा अवस्थेत येतो.
◼️ दुधाळ अवस्थेत या वाणाचे दाणे अतिशय मऊ, गोड व रुचकर असून कणसापासून दाणे सहज वेगळे करता येतात.
२) फुले मधुर
◼️ हा वाण मफुकृवि, राहुरी कृषी विद्यापीठाने २०१५ साली पश्चिम महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात हुरडा लागवडीसाठी प्रसारित केला आहे.
◼️ या वाणाचा हुरडा गोड व रुचकर असून दाणे कणसापासून सहजरित्या वेगळे करता येतात.
◼️ हा वाण अवर्षणप्रवण स्थितीत लागवड करण्यासाठी योग्य आहे.
◼️ या वाणापासून हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल हुरडा आणि ८५ ते ११० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते.
३) ट्रॉम्बे अकोला सुरुची (टी ए के पी एस ५)
◼️ महाराष्ट्रासाठी प्रसारित.
◼️ मळणीस अतिशय सुलभ.
◼️ हुरड्याची प्रत उत्तम, चवदार.
◼️ हुरडा तयार होण्याचा कालावधी ९१ दिवस.
◼️ हुरड्याचे उत्पादन ४३ क्विंटल.
◼️ हिरवा चारा उत्पादन ११० क्विंटल आहे.
अधिक वाचा: तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे
