सध्या पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे दरवर्षी अनेक जणांना विषबाधेला सामोरे जावे लागते.
त्यासाठी फवारणीदरम्यान हात स्वच्छ धुवावे, फवारणी झाल्यानंतरच तोंडाला स्पर्श करावा, फवारणी करताना तंबाखू चोळणे, जेवण करणे धोकादायक ठरू शकते. यातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमध्ये रेड मार्क असलेली कीटकनाशके अत्यंत विषारी मानली जातात. अशा रसायनांची फवारणी करताना त्याचा मानवी शरीरावर आणि श्वसनमार्गावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो सायंकाळच्या वेळेस, अन्न सेवन केल्यानंतर आणि योग्य संरक्षक साधनांचा वापर करूनच फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
फवारणी करताना अशी घ्यावी काळजी
◼️ फवारणी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात लागणार आहेत. योग्य कीटकनाशक निवडून त्याचा वापर करावा.
◼️ फवारणी करताना सुरक्षेची साधने जसे मास्क, ग्लोव्हज, गॉगल्स आणि फवारणी सूट वापरणे आवश्यक आहे.
◼️ फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी केली पाहिजे.
◼️ फवारणी करताना नळीमध्ये अडथळा आल्यास तोंडाने फुंकर मारणे टाळावे. यामुळे कीटकनाशक तोंडातून आत जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते.
◼️ आपल्या आरोग्याची काळजी घेत कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे आहे.
लहान मुले, आजारी, वृद्ध व्यक्ती सोबत नकोत
कीटकनाशकांच्या प्रभावामुळे लहान मुले, आजारी, वृद्ध व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वृद्ध व्यक्तींचे शरीरदेखील कीटकनाशकांचा सामना करण्यासाठी कमकुवत असू शकते. यामुळे फवारणी करताना काळजी घ्यावी लागणार आहे.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सतर्कता गरजेची
ऑगस्ट महिना हा पिकांच्या वाढीसोबत फळधारणेसाठी महत्त्वाचा असतो. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी करत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये सजगता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
विषबाधेची लक्षणे
डोळ्यांची किंवा त्वचेची जळजळ, उलटी, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडचण, थकवा आणि पोटदुखी ही विषबाधेची सामान्य लक्षणे आहेत. अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
विषबाधा झाल्यास काय कराल?
विषबाधा झालेल्या व्यक्तीला ताबडतोब स्वच्छ आणि मोकळ्या हवेत जाऊन बसावेत. जर विषारी औषध डोळ्यात गेले असेल, तर डोळे स्वच्छ पाण्याने १० ते १५ मिनिटे धुवावेत. लगेच डॉक्टरकडे घेऊन जावे. उपचारांसाठी जाताना फवारणी केलेल्या कीटकनाशकाची बाटली सोबत घेऊन जायेत जेणेकरून योग्य उपचार करता येतील.
अधिक वाचा: ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास अशी होणार कारवाई?