Join us

फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल

By रविंद्र जाधव | Updated: May 10, 2025 16:05 IST

Water PH : पाणी आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. कोणत्याही सजीवासाठी पाणी अत्यावश्यक आहे. मग तो मानव असो, प्राणी असो की वनस्पती. परंतु केवळ पाणी असून चालत नाही, तर त्या पाण्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची असते. यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याचा सामू अर्थात पीएच (pH).

पाणी आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. कोणत्याही सजीवासाठी पाणी अत्यावश्यक आहे. मग तो मानव असो, प्राणी असो की वनस्पती. परंतु केवळ पाणी असून चालत नाही, तर त्या पाण्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची असते. यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याचा सामू अर्थात पीएच (pH).

मात्र दुर्दैव आहे की, शेतकरी बांधव शेतात पिकांवर विविध कीटकनाशक, बुरशीनाशक यांची फवारणी करताना किंवा पिण्यासाठी पाणी वापरताना पाण्याचा पीएच कधीच बघत नाहीत. पाण्याचा पीएच योग्य असल्यास केलेल्या फवारणीचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात.

पीएच म्हणजे काय?

• पीएच म्हणजे (Potential of Hydrogen) पाण्यातील आम्लता (Acidic) किंवा क्षारीपणा (Alkaline) दाखवणारे एक परिमाण आहे. पीएच स्केल ० ते १४ दरम्यान असतो.

• पीएच ७ म्हणजे तटस्थ पाणी (जसे की स्वच्छ पिण्याचे पाणी).

• पीएच ७ पेक्षा कमी म्हणजे आम्लीय पाणी.

• पीएच ७ पेक्षा जास्त म्हणजे क्षारी पाणी.

फवारणीसाठी पाण्याचा पीएच का महत्त्वाचा?

शेतीमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते फवारणीसाठी वापरली जातात. फवारणी करताना वापरले जाणारे पाणी जर चुकीच्या पीएचचे असेल तर त्याचा फवारणीच्या प्रभावावर थेट परिणाम होतो.

• अधिक आम्लीय (pH कमी) किंवा अधिक क्षारी (pH जास्त) पाणी अनेक वेळा औषधांची प्रभावी रचना बिघडवते. त्यामुळे ती औषधे व्यवस्थित कार्य करत नाहीत.

• काही कीटकनाशके (उदा. ऑर्गॅनोफॉस्फेट गटातील) फक्त तटस्थ ते किंचित आम्लीय पाण्यातच योग्य परिणाम देतात.

• जर पाण्याचा पीएच ८ पेक्षा जास्त असेल, तर अनेक औषधांचे हायड्रोलिसिस होते म्हणजे ते फवारणीपूर्वीच निष्क्रिय होतात.

• चुकीचा पीएच असल्याने पिकांचे उत्पादनही घटते आणि आर्थिक नुकसान होते.

पिण्याच्या पाण्यासाठी पीएच का महत्त्वाचा?

• आपले शरीर तटस्थतेजवळील पीएच असलेल्या पाण्याला सहज स्वीकारते.

• पीएच ६.५ ते ८.५ हे पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित मानले जाते.

• जर पाणी अत्यंत आम्लीय (pH ५ पेक्षा कमी) असेल तर ते पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते आणि पचनविकार उद्भवू शकतात.

• अत्यंत क्षारी पाणी देखील त्वचा कोरडी होणे, पचनाचा त्रास, तसेच इतर त्रास देऊ शकते.

पीएच कसा तपासावा?

आजकाल बाजारात सहज उपलब्ध असलेले पीएच मीटर किंवा पीएच पेपर स्ट्रिप्स वापरून आपण पाण्याचा पीएच घरीच तपासू शकतो. शेतकऱ्यांनी फवारणीपूर्वी पीएच तपासल्यास औषधांचा प्रभाव वाढतो. 

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीआरोग्यशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रण