लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घट झाली आहे.
तर मागील पंधरा दिवसांत बाजारभाव तब्बल १ हजार रुपयांनी घसरला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये झालेल्या सुमारे २० लाख क्विंटल कांद्याच्या आवकमागे अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
लासलगावसह देशभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने बाजारात पुरवठा वाढला असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे. त्याचबरोबर अरब देशांच्या बाजारपेठेत चीन व पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात बाजार समितीत १५०५ वाहनांद्वारे सुमारे २३ हजार ४२० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त दर २ हजार २०० रुपये, किमान दर ७०० रुपये, सरासरी दर १६२५ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. त्यामुळे सध्या मिळणारा कांद्याला बाजारभाव हा परवडण्याजोगा नाही.
अरब देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत आहे. परिणामी भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम कांदा निर्यात व्यावसायिकांवर होत आहे.
- प्रवीण कदम, कांदा निर्यात व्यापारी, लासलगाव
नागरिकांना कांदा महाग झाल्यास कमी दरात किंवा वाजवी दरात मिळावा म्हणून कें शासन भरीव निधीची तरतूद करते. तशीच तरतूद कांदा उत्पादकांचे भाव कमी झाल्यावर त्यांना कांदा अनुदान देण्यासाठी - शासनाने दरवर्षी केली पाहिजे. कांद्याच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे.
- जयदत्त होळकर, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
