भेंडीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक विविध जीवनसत्त्वे, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते.
भेंडीचा वापर कागद निर्मिती उद्योगामध्ये केला जातो. हिरव्या भेंडीच्या तुलनेने लाल भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट, लोह, कॅल्शिअमचे प्रमाण अधिक आहे. पंचतारांकित हॉटेल, मॉल, शहरी भागात या भेंडीला मागणी आहे.
जमिन व हवामान
- केवळ खरीप हंगामातच नाही तर रब्बी व उन्हाळी हंगामातही भेंडी लागवड करणे शक्य आहे.
- भेंडी पिकाला उष्ण हवामान चांगले मानवते.
- हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. मात्र, लागवड केलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते.
सुधारित जाती
अधिक उत्पादनासाठी भेंडीच्या कोकण भेंडी, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, पंजाब-७, विजया, वर्षा उपहार, परभणी भेंडी, फुले विमुक्ता या सुधारित जातींची लागवड करावी.
कशी कराल लागवड?
- भेंडीची लागवड खरीप हंगामात जून-जुलैमध्ये, उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, तर रब्बी हंगामात ऑक्टोबरमध्ये लागवड केली जाते.
- खरिपात लागवड करताना ६० बाय ६० सेंटिमीटर अंतरावर, तर उन्हाळ्यात ४५ बाय १५ सेंटिमीटर अंतरावर करावी.
- त्यासाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. खरिपात हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे होते.
- बी लावण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसीलच्या (१०० मि.लि. प्रती लिटर) द्रावणात २४ तास भिजवावे.
- नंतर बियाणे काढून सावलीत कोरडे करून पेरावे. यामुळे उत्पन्न १० ते १५ टक्के वाढते.
आंतरमशागत
- दोन ते तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी.
- यावेळी खुरपणी करून तण काढावे.
- साधारणतः दोन ते तीन खुरपण्या कराव्या लागतात.
खत व पाणी व्यवस्थापन
- भेंडीच्या पिकास हेक्टरी १५ टन शेणखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे.
- लागवडीच्यावेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व एक तृतीयांश नत्र यांची मात्रा द्यावी.
- उरलेले दोन तृतीयांश नत्र समप्रमाणात लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांनी द्यावे.
काढणी
- भेंडीची काढणी फळे कोवळी असताना करावी.
- झाडास फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून ६ ते ७ दिवसांत फळे काढणीसाठी तयार होतात.
- जातीपरत्वे हेक्टरी १०० ते १२० क्विंटल उत्पादन मिळते.
- सतत पुरवठा करण्यासाठी भेंडी १५ ते २० दिवसांचे अंतर ठेवून टप्प्यात लागवड करावी.
अधिक वाचा: खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर