सोपान भगत
घोडेगाव : नोव्हेंबर महिना सरत आला, तरी गावरान उन्हाळ कांदाबाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे नवीन लाल कांद्याच्या दरात घसरण झाली असून, गावरान कांद्यामुळे लाल कांद्याचा वांधा झाल्याचे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दरवर्षी ऑक्टोबरअखेर उन्हाळा गावरान कांदाबाजारात विक्रीला येण्याचे प्रमाण अगदी नगण्य असते; मात्र यावर्षी उन्हाळ गावरान कांद्याचे अतिरिक्त उत्पन्न झाले. त्यात कमी दरामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली.
नोव्हेंबर उजाडला, तरी कांद्याचे दर वाढलेले नाहीत. वखारीत ठेवलेला कांदाही आता खराब होऊ लागला आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वखारी फोडण्यास सुरुवात केली आहे.
त्याचवेळी लाल कांदाही बाजारात येऊ लागला आहे. मात्र, गावरान कांद्याच्या स्पर्धेत हा लाल कांदा टिकू शकत नाही. अतिवृष्टीमुळे नवीन लाल कांद्याला क्वॉलिटी नाही.
उन्हाळ गावरान कांदा बाजारात येत असल्याने व्यापारीही लाल कांद्याऐवजी उन्हाळ गावरान कांदा खरेदी करीत आहेत. त्यामुळे लाल कांद्याचे दर अगदीच कवडीमोल झाले असून, ते मार्केटला आणणेही परवडत नाही.
अनेक शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या कांदा पिकात नांगर घालून दुसरे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. गावरान कांद्यालाही पुरेसा दर नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
घोडेगाव बाजारातून नवीन लाल कांदा खरेदी करून तो हैदराबाद किंवा बंगळुरूला नेण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागतात.
या कालावधीत ओल्या लाल कांद्याला मोड येतात. त्यामुळे तेथील ग्राहकही लाल कांद्याऐवजी गावरान कांदा खरेदीला प्राधान्य देत आहेत. - गोविंद राजू, व्यापारी, बंगळूरू
दरवर्षी ऑक्टोबरअखेर गावरान कांदा बाजारात येणे बंद होते. त्यानंतर नवीन लाल कांदा बाजारात येऊ लागतो. गावरान कांदा संपल्याने व्यापाऱ्यांना लाल कांदा घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे लाल कांद्यालाही चांगला दर मिळतो; परंतु यावर्षी गावरान कांद्याची आवक अजूनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यापारी गावरान कांदाच खरेदी करीत आहेत. - राजेंद्र होंडे, कांदा आडतदार, घोडेगाव
अधिक वाचा: सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर?
