श्रीरामपूर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कांद्याचे बाजारभाव १३०० ते १५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले.
चाळीतील कांद्याचे आयुष्य आता संपत आले आहे. त्यामुळे पदरात पडेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सोमवारी श्रीरामपूर येथील बाजार समितीत उच्च प्रतीच्या कांद्याला १३०० ते १५५० रुपये क्विंटलपर्यंत भाव आला. दुय्यम प्रतीचा माल ९०० ते १२५० रुपये क्विंटलने विक्री झाला. गोल्टी कांद्याला ८०० ते ११०० रुपये दर मिळाले.
कांद्याचे बाजारभाव एप्रिल व मे महिन्याच्या प्रारंभी १८०० रुपये क्विंटलवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत कांद्याला २५०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळतील अशी अपेक्षा होता.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवणूक करून ठेवला होता. आता मात्र, ढगाळ वातावरणामुळे कांदा खराब होत आहे. त्याची टिकवण क्षमता संपलेली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडला आहे. पर्यायाने मिळेल त्या बाजारभावात कांदा विक्रीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पन्न खर्च निधनेही अवघड झाले आहे.
४० रुपयांवर कांदा गोणी, रिकाम्या कांदा गोणीचे बाजारभाव ३९ ते ४० रुपये झाले आहेत. कांदा भराईसाठी गोणीमध्ये मजूर २० ते ३० रुपये खर्च घेतात. याशिवाय वाहतुकीचा खर्च गोणीमध्ये २० ते ३० रुपये होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्याच्या बाजारभावाप्रमाणे कांदा विक्रीतून काहीही आर्थिक लाभ होत नाही. यंदा केवळ उत्पादन खर्च भरून निघाला तरी खूप होईल, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
विक्रीशिवाय पर्याय नाही
चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठविला. दर मात्र, काही वाढला नाही. आता पावसाळी आणि दमट वातावरणामुळे चाळीतील कांदा खराब होऊ लागला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.
अधिक वाचा: इथेनॉल संबंधी 'ती' याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा