Join us

जूनमध्ये २० रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या सोलापूरच्या केळीला आता किती मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:08 IST

Keli Bajar Bhav जून महिन्यात १८ ते २० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विकली जाणारी केळी, जळगाव जिल्ह्यातील केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.

करमाळा : जून महिन्यात १८ ते २० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विकली जाणारी केळी, जळगाव जिल्ह्यातील केळीबाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.

सोलापूर येथील केळी उत्पादकांना केळी ३ ते ५ रुपये प्रतिकिलो दराने विकावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव हा राज्यातील केळी उत्पादनामध्ये क्रमांक एकचा जिल्हा आहे.

हवामानामुळे जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन सिझनल असते, तर सोलापूर जिल्ह्यात केळीचे उत्पादन वर्षभर होत असते. सोलापुरातील केळीला अरब देशांत मोठी मागणी आहे.

सध्या कंटेनरमधून जाणाऱ्या मालाला मागणी तसेच भावही चांगला आहे. जूनमध्ये केळीचे दर १८ ते २२ रुपये, जुलैमध्ये २२ ते २३ रुपये, ऑगस्टमध्ये १३ ते १५ रुपये प्रतिकिलो एवढे होते; तर सप्टेंबरमध्ये केळीचा दर फक्त ३ ते ५ रुपये प्रतिकिलो एवढा आहे.

केळीचे दर व्यापाऱ्यांकडून सडेतोड पाडले जात आहेत. बोर्डावर दर्शवलेले भाव केवळ नावाठी असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त तीन ते पाच रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

केळी चांगली असो की खराब, तरीही व्यापाऱ्यांकडून चांगला भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

१५ दिवसांत दरात मोठी घसरणगेल्या पंधरा दिवसांत केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून, मुंबई, ठाणे, पुणे अशा अनेक ठिकाणी व्यापारी केळी फक्त ३ ते ५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करत आहेत. अनेक व्यापारी या घसरणीसाठी जळगाव जिल्ह्यातील केळी बाजारात मोठ्या प्रमाणात केळी आल्यास कारणीभूत असल्याचे सांगतात.

गणेशोत्सवामुळे बाजारात केळीची मागणी थोडीशी वाढली असली तरीही शेतकऱ्यांकडून कमी भावाने माल खरेदी होतो आहे. दुसरीकडे बाजारात केळी पन्नास रुपये प्रतिडझनाने विकली जात असतानाही व्यापारी मागणी नसल्याचा आधार देत शेतकऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी करत आहेत. - राजेंद्र बारकुंड, केळी उत्पादक, चिखलठाण

सोलापूर जिल्हा, जो देशभर केळीसाठी प्रसिद्ध आहे, येथील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता पितृपक्ष सुरू झाल्याने केळीची मागणी आणखीन घटली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन किंवा राजकीय नेते शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कधी लक्ष देतील, हे प्रश्न उपस्थित आहेत. - धुळाभाऊ कोकरे, केळी उत्पादक, कुगाव

अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

टॅग्स :केळीबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीसोलापूरजळगावपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीहवामान अंदाज