Join us

निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:54 AM

मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला.

धर्मराज दळवेमुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला.

याशिवाय आंध्र प्रदेशातील केळी उपलब्ध होत असल्याने करमाळा तालुक्यातील केळीच्या दरात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. निर्यातक्षम केळीचा दर २४ रुपये प्रतिकिलोवरून १५ रुपयांवर आला आहे. त्यामुळे केळी उत्पादक धास्तावला आहे.

करमाळा तालुक्यातून दररोज निर्यातक्षम केळी मुंबईला जात होती. मात्र, मंगळवार (दि.५) पासून निर्यात थांबल्याने केळीच्या दरात प्रतिकिलो ८ ते १० रुपयांनी घट झाली. मागील अनेक दिवसांपासून खोडवा केळी निर्यातदार खरेदी करत नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन सांभाळलेल्या केळी पिकातून फायदा मिळण्याऐवजी असेच दर राहिल्यास शेतकऱ्यांना तोटा होईल. करमाळा तालुक्यात नऊ हजार हेक्टरवर केळीची लागवड करण्यात आली आहे.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील केळी ही निर्यातक्षम आहे. ती कंपन्यांच्या माध्यमातून आखाती देशात पाठवली जाते. दुबई, इराण, अफगाणिस्तान येथे केळी पाठवली जाते. आंध्र प्रदेशातील केळीची आवक कायम असल्याने केळीचा उठाव कमी झाला.

निर्यातक्षम केळीचे प्रतिकिलो दरपूर्वीचा दर : २४ रुपयेआताचा दर : १५ रुपये

केळी साठवणुकीचे नऊ कोल्ड स्टोअरेज भरलेउतरलेली केळी साठवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली जाते. अकलूजला एक, कंदरला तीन, टेंभुर्णीमध्ये एक, इंदापूरला एक, बारामतीमध्ये एक असा नऊ कोल्ड स्टोअरेजमध्ये माल साठवला जातो. ती सर्वच्या सर्व भरलेली आहेत. त्यामुळे नवा माल बागेतून काढता येत नाही.

केळी पिकाला चांगला दर मिळत असल्यामुळे ऊस पिकाला बगल देऊन तीन एकर केळीची लागवड केली. परंतु, अचानक निर्यातीस अडचण निर्माण झाल्याने दर पडले. केळी निर्यातीत होणारी अडचण दूर करण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. - विजय शिंदे, केळी उत्पादक, वाशिंबे

आखाती देशात मुंबई बंदरातून केळीसह इतर माल पाठवण्यात येतो. परंतु, सध्या केळी पाठवण्यासाठी मालवाहतूक जहाज उपलब्ध होत नाही. जहाजांच्या वाहतूक दरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे केळीची निर्यात थांबली आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या केळीबागा अडचणीत आल्या आहेत. - रंगनाथ शिंदे, केळी निर्यातदार, कंदर

करमाळा तालुक्यात एकूण जून २०२३ नंतर ९००० एकरांवर केळी लागवड झाली आहे. उजनी लाभक्षेत्रात अजूनही लागवड सुरू आहे. सध्या आठ हजार एकरांवर तालुक्यात खोडवा केळी आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस मोडून केळी लागवड केली. - संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :केळीबाजारसोलापूरआंध्र प्रदेशशेतकरीकरमाळाफलोत्पादनफळेमुंबईदुबईइराणअफगाणिस्तान