एरवी आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळते, पण आता बाजार समित्यांमध्ये आवक कमी होण्याच्या काळातही दर कमी झाले आहेत. देशातील तुरीचे उत्पादन कमी असतानाही केवळ सरकारच्या आयात धोरणामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर तूर उत्पादकांमध्ये चिंतचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे.
गेली दोन वर्षे तुरीच्या हंगामाची सुरुवात चांगल्या दराने झाली होती. यंदा तूरबाजारावर दबावाचे सावट आहे. साधारणतः एप्रिल महिन्यापासून बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ पाहायला मिळते. उत्तरोत्तर आवक कमी होत असल्याने दराची पातळी कमी होत नाही. यंदा मात्र चित्र वेगळेच आहे.
तुरीचा नवा हंगाम तोंडावर आहे. येत्या काही दिवसांतच नवी तूर बाजारात दाखल होणार असून, जुन्या तुरीची आवक आता नगण्य आहे. अशात तुरीच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही.
शनिवारी वाशिम जिल्ह्यातील तीन मुख्य बाजार समित्यांमध्ये तुरीला कमाल सरासरी ६ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जुन्या तुरीची आवक नाममात्र
वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत जुन्याच तुरीची आवक होत आहे. काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने तुरीची साठवणूक केली होती. मात्र, या तुरीचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये या तुरीची आवक नाममात्र आहे.
तुरीला कोठे किती कमाल दर? (क्विंटल)
कारंजा - ७००५
वाशिम - ६७९०
रिसोड - ६७५५
तुरीला ८ हजार रुपये क्विंटलचा हमीभाव
• केंद्र शासनाने गतवर्षी तुरीला ७५५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला होता.
• जुन्या तुरीची खरेदी अद्यापही हमीभावापेक्षा हजार रुपये कमी दराने केली जात आहे. आता यंदा शासनाने तुरीला ८ हजार रुपये प्रती क्विंटलचा हमीभाव घोषित केला आहे.
यंदा तुरीच्या क्षेत्रात घट
• गत हंगामात जिल्ह्यात ६६,४३६ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती.
• यंदाच्या हंगामात वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाने ६४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्रावर तुरीच्या पेरणीचे नियोजन केले होते.
• प्रत्यक्षात यंदा ६४ हजार २०२ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. अर्थात गतवर्षीच्या तुरीचे क्षेत्र २३४ हेक्टरने घटले आहे.
आठवडाभरात नवी तूर दाखल होणार!
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील तुरीचे पीक काढणीवर आले आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी नियोजनही सुरू केले आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात बाजारात नवी तूर दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
