दोन महिने राब-राब राबून शेती मशागत पूर्ण केली असून खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे; परंतु नगदी पीक असलेल्या सोयाबीनला (Soybean) भाव म्हणावा तसा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन खरीप हंगामामध्ये बियाणे, खते, औषध घेण्यासाठी आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
हळदीच्या दरात सुरुवातीस तेजी दिसून येत होती; परंतु दोन दिवसांत सातशे ते नऊशे रुपयांनी भाव घसरले गेले आहेत.
गतवर्षीच्या खरीप हंगामात काही पिके अतिपावसामुळे गेली तर काही पिके कीड लागल्यामुळे हातची गेली. त्यातच नशिबाने जी काही पिके उरली होती त्या पिकांना म्हणावा तसा भावही मिळाला नाही. त्यामुळे एक ना अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला.
यावर्षी खरिपाच्या तोंडावर हळद, सोयाबीन व इतर पिकांना भाव मिळेल, असे वाटले होते; परंतु खरीप हंगाम जवळ आला तरी एकाही पिकाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. शेतकरीवर्गशेतीमाल वसमत मोंढ्यात घेऊन येत आहेत; परंतु दोन-दोन दिवस भावच होत नाही, अशी परिस्थिती आहे.
यावर्षी पाऊस (Rain) चांगला आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हे पाहून शेतकरी बियाणे, खते घेण्यासाठी बाजारपेठेत येऊ लागले आहेत; परंतु बियाणाला भाव मिळता नाही म्हणून शेतकरी घरचा रस्ता धरू लागले आहेत. एकंदर शेतकरीवर्ग सर्वच बाजूंनी चिंतेतच असल्याचे पाहावयास मिळत आहे.
दोन वर्षापासून महागाई कमी होईना
गतवर्षी बियाणांचा भाव कमी होता. यावर्षी भाव वाढलेला पाहायला मिळत आहे. शेती कशी करावी आणि कुटुंबाचा गाडा कसा चालवावा? हे मात्र शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही. - शेख अब्दुल, शेतकरी.
रात्रंदिवस शेतात काम करायचे आणि पिके काढायला आली की, शेतमालाचे भाव घसरू लागतात. बहुतांश शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळेल म्हणून हळद व सोयाबीन घरीच ठेवले आहेत. भाववाढीची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत. - बालाजी दळवी, शेतकरी.
शेतमालाचे सध्याचे भाव
| हळद | १५५०० |
| सोयाबीन | ४४०० |
| तूर | १२००० |
| भुईमूग | ६००० |
हेही वाचा - Banana Success Story पारंपरिक पिकांना फाटा देत लागवड केलेली वरुडची केळी गेली आता इराकला
