अमरावती : केंद्र शासनाने यावर्षी तुरीला ७५५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात वर्षभर तुरीला १० ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. आता नवीन तूरबाजारात येण्याच्या पार्श्वभूमीवर आता तुरीचे भाव ७५०० ते ८००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. १५ दिवसांत क्विंटलमागे २००० रुपयांनी कमी आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदाच्या खरिपात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीने शेतात पाणी साचले. त्यामुळे तूर पिवळी पडली व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन तुरीवर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव झाला व काही भागांतील तूर जाग्यावर सुकली आहे. शिवाय तूर बहरावर व शेंगा भरण्याच्या काळात 'फेंगल' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण होते.
त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला झाला. अशा परिस्थितीत तुरीच्या सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीची मागणी वाढून उच्चांकी भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.
तुरीला वर्षभर हमीभावापेक्षा कितीतरी जास्त भाव मिळाला. यंदा मात्र उत्पादन कमी असताना भाव वाढेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना हंगामाच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
आर्द्रतेच्या नावावर दर पाडण्यास सुरुवात
नवीन तुरीत आर्द्रता जास्त असल्याचे कारण जिल्ह्यात सध्या हलक्या प्रतवारीच्या जमिनीतील तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. शिवाय मराठवाडा व कर्नाटक राज्यातही तुरीचा हंगाम सुरू झालेला आहे. या तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने दरात घसरण झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. जिल्ह्यात जानेवारीत तुरीचा हंगाम सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांद्वारा आतापासूनच दर पाडण्यास सुरुवात होत असल्याचा आरोप होत आहे.
तुरीचे बाजारभाव (क्विंटल)
०७ नोव्हेंबर : १०३०० ते १०८००
२७ नोव्हेंबर : ९५०० ते १०१५०
०२ डिसेंबर : ९००० ते १००००
११ डिसेंबर : ९२५० ते ९८११
१६ डिसेंबर : ८८५० ते ९३००
१८ डिसेंबर : ८५०० ते ८८००
२० डिसेंबर : ८००० ते ८२५१