दरीबडची : एकीकडे धान्य पिकाला भाव नाही, त्यातच दुसरीकडे तूर लागवडीतून तरी पैसा हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा असताना तुरीचा दर दहा दिवसांत दीड ते दोन हजार रुपयांनी घसरला आहे.
१० हजार रुपये प्रतिक्विंटल असलेले तुरीचे भाव आता ८१०० रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. रावळगुंडवाडी, मुचंडी, उंटवाडी, तालुक्यात पाच्छापूर, देवनाळ, अमृतवाडी, वळसंग, शेड्याळ परिसरात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
यावर्षी ९ हजार २३०.६० हेक्टर क्षेत्रावर पीक घेण्यात आले. दुय्यम पीक असलेल्या तुरीला भाव मिळेल. अशी अपेक्षा असताना तुरीचे भाव घसरत आहेत. यंदा उत्पादन बऱ्यापैकी आहे, मात्र आयात केलेल्या तुरीमुळे भाव घसरला आहे.
१० दिवसांपूर्वी दर चांगला मिळाला
शासनाने तुरीसाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. आता शेतकऱ्यांनी तूर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी तुरीला १० हजार ते ९७५० रुपये भाव मिळत होता. आता मात्र हा दर १५०० ते २ हजार रुपयांनी खाली आला असून ७९०० ते ८१०० रुपये दर पोहोचला आहे.
डाळ गिरणीची आवश्यकता
जत पूर्व भागात सहकारी तत्त्वावर डाळ गिरणी सुरू करावी. तूर डाळाची पॅकींग करून मॉल, सोसायटीला पाठवून विक्री करून चांगला फायदा घेण्याची संधी आहे. सध्या एक किलो तूर डाळीचा दर १७० रुपये आहे.
तीन एकरवर तूर पेरणी केली आहे. शेतकऱ्यांनी महागडी औषधाची फवारणी करून मोठ्या जिकिरीने पीक आणले आहे. दर घसरत असल्याने चिंता वाढली आहे. - विलास शिंदे, तूर उत्पादक, शेतकरी
मागील २-३ वर्षात तुरीचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळाला, मागच्या दहा दिवसांत तब्बल १,५०० ते २ हजार रुपयांनी दर घसरले आहेत. ही बाब तूर उत्पादकांची चिंता वाढविणारी आहे. आगामी काळात दरात अशीच घसरण सुरू राहिल्यास शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून तूर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही अपेक्षा. - प्रा. बी. एस. पाटील, तूर उत्पादक शेतकरी, पाच्छापूर
अधिक वाचा: शेतकरी विनायक यांनी एकरी १३० टन ऊस उत्पादनाचे स्वतःचेच रेकॉर्ड तोडले; यंदा किती टन उत्पादन