सोलापूर: कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला होता.
तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी २५ क्विंटल तुरीची आवक झाली होती, तिला किमान ८,७०० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव होता.
मात्र सध्या आवक वाढल्याने तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २६ डिसेंबर रोजी ५२५ क्विंटल तुरीची आवक झाली, त्यास ६ हजारांपासून ७९०० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे.
गेल्या आठवड्यात दोनशे ते २५० क्विंटल तुरीची आवक होत होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आवक दुप्पट झाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला ७,९०० रुपये इतका कमाल भाव मिळतोय. तर सरासरी भाव हा ८ हजार रुपयांच्या जवळपास आहे.
मागील आठ दिवसांत नव्या तुरीच्या दरात २,००० रुपयांची घसरण झाल्याने आवकही घटली आहे. त्यामुळे या हंगामातदेखील शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत तूर घरात साठवून ठेवण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून संताप
- यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते.
- मात्र या वर्षी उत्पादन चांगले झाल्याने चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेत असताना शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली आहे.
- विशेष म्हणजे केंद्र सरकारने तुरीला ७,५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र बाजारात हमीपेक्षा कमी भावाने तुरीची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
अधिक वाचा: एक आड एक सरीत उसाचे पाचट ठेवले तर काय होतील फायदे; वाचा सविस्तर