पालघर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडत्या दरामुळे गेल्या दोन वर्षांपासून निराशा येत आहे. वर्षभर प्रतीक्षा करूनही धान्याचा भाव दोन हजार ५०० रुपयांच्या वर जात नसल्याने शेतकरी काळजीत आहे. सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यात धान्याच्या किमतीत वाढ होते; परंतु या दरवाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होतो.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसतो. यंदा जास्तीत जास्त दोन हजार ते दोन हजार ८०० रुपयांवर भाव जाऊ शकतो. गेल्या आठवड्यापासून व्यापारी घेत असलेल्या भातात क्विंटलमागे १०० ते १५० रुपये वाढ होत आहे; परंतु शेतकऱ्यांकडे भात शिल्लक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
उत्पादन खर्च वाढला
भाववाढ होत नसल्याने शेतकऱ्यांना भात कमी दराने व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ येते. त्यामुळे त्याच्च्या पदरी निराशाच येते. अलीकडच्या काळात उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होत असून, बाजारभावही समाधानकारक मिळत नाही. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल होत नाही.
भाववाढीची कारणे काय?
दुकानांमध्ये मिळणारा तांदूळ हा अनेक वेळा औषध फवारणी करून विकला जातो. त्यामुळे या तांदळामुळे पचनास अडचणी निर्माण होतात. अशावेळी अनेक जण भात खरेदी करून तो भरडून खाणे पसंत करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून भात विकत घेताना ग्राहकांना चढ्या भावाने भात खरेदी करावा लागतो.
भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्च भरून निघत नाही. त्यामुळे राज्य सरकारने भाताला किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा. तेव्हाच धानाची शेती परवडेल. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून दिलासा द्यावा. - किशोर पाटील, शेतकरी, देवघर.
हमीभावात तीन हजार रुपयांची हवी वाढ
२०२५-२६ च्या हंगामामध्ये भाताला हमीभाव प्रतिक्विंटलला तीन हजार रुपयांनी वाढ अपेक्षित आहे. ही वाढ अधिक व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
खासगी व्यापाऱ्यांना भात देण्यास प्राधान्य
आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदी केला जातो. हा भात उशिरा खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही अपुरे बारदान, दोन ते तीन दिवस मुक्काम व पैशासाठीही प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकरी आदिवासी विकास महामंडळाऐवजी खासगी व्यापाऱ्यांना भात देणे पसंत करतो.