Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने टोमॅटोच्या भावात उसळी; दरवाढीतून शेतकऱ्यांना मात्र दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:23 IST

वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादन घटल्याने बाजारात टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. शनिवारी नारायणगाव बाजारात टोमॅटोचे दर प्रति कॅरेट ३५० ते ५५० रुपयांपर्यंत पोहोचले.

वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादन घटल्याने बाजारातटोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. शनिवारी पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव बाजारात टोमॅटोचे दर प्रति कॅरेट ३५० ते ५५० रुपयांपर्यंत पोहोचले. वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी वाढलेला भांडवली खर्च त्यांच्या चिंतेत भर घालत आहे.

आंबेगाव तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली जात होती. मात्र, हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता खर्च यामुळे आता निवडक भागांमध्येच टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतकरी लवकर लागवड करतात; पण तीव्र उष्णतेमुळे रोपांची मर वाढते, फुले गळतात आणि उत्पादनात घट येते.

शेतकरी महेश मोरे यांच्या मते, "उन्हाळ्यात टोमॅटो पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेमुळे रसशोषक किडी, कोळी रोग आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे वेळोवेळी औषध फवारणी आणि पाणी व्यवस्थापन करावे लागते." या उपाययोजनांमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील शेतकरी गोपीचंद शिंगोटे यांनी एक एकरात टोमॅटो लागवड केली असून त्यासाठी सुमारे १ लाख ७० हजार रुपये खर्च आला आहे. उष्णतेमुळे जैविक औषधे, कीटकनाशके आणि वाढीची औषधे मोठ्या प्रमाणावर वापरावी लागली. सुरुवातीला कमी दर मिळाल्याने नुकसान झाले.

मात्र सध्या दर वाढल्याने परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंगोटे यांनी शनिवारी ११८ कॅरेट टोमॅटो बाजारात पाठवले असून त्यांना प्रति कॅरेट ४१५ रुपये दर मिळाला. मॉलमध्ये पाठवलेल्या टोमॅटोला प्रति किलो सुमारे ४० रुपये दर मिळाला. मजुरीतही वाढ झाली आहे.

...तर नफा मिळू शकतो

एका मजुराला तोडणीसाठी ४०० रुपये आणि वाहतूक खर्च १०० रुपये असा एकूण ५०० रुपये खर्च येतो. दरम्यान, बाजारभावात वाढ कायम राहिल्यास टोमॅटो पिकातून चांगला नफा मिळू शकतो, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टोमॅटो पिकावर उष्णतेचा परिणाम

• तीव्र उष्णतेमुळे रोपांची मर वाढते.

• फूलगळ आणि फळधारणा कमी होते.

• रसशोषक किडी, कोळी रोग व व्हायरस वाढतात.

• वारंवार पाणी व औषध फवारणी आवश्यक.

• उत्पादन घटल्याने खर्च वाढतो.

सध्याची बाजारस्थिती

• कॅरेट दर : ३५० ते ५५० रुपये

• सरासरी दर : सुमारे ४१५ रुपये

• किरकोळ बाजार (मॉल) : सुमारे ४० रुपये प्रति किलो

• उत्पादन खर्च : एकरी १.४० ते १.७० लाख रुपये

हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tomato Prices Soar Due to Heat; Farmers Get Slight Relief.

Web Summary : Rising temperatures damage tomato crops, increasing prices. Farmers see some relief, but high costs remain a concern. Production costs range from ₹1.4 to ₹1.7 lakh per acre. Prices reach ₹550 per crate in Narayangaon market.
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रशेतकरीशेतीपुणेभाज्याबाजारमार्केट यार्ड