संजयकुमार चव्हाण
मांजर्डे : तासगाव व मिरज पूर्व भागात यंदाचा द्राक्ष हंगाम जोमात सुरू असून, द्राक्षांना प्रतिकिलो ५४० रुपये व त्यापेक्षा जास्त दर मिळत आहे.
त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात द्राक्षे निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढल्याने मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
कोरोनानंतरच्या काळात अवकाळी पाऊस, बदलते व लहरी हवामान यामुळे सलग दोन ते तीन वर्षे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला होता.
उत्पादन घटल्याने व अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडले होते.
मात्र, यावर्षी प्रतिकूल हवामान असतानाही हंगामाच्या सुरवातीस योग्य वेळी पीक छाटणी घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने द्राक्षबागांचे संगोपन लाखोंचा खर्च करुन करण्यात आले.
खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे उत्तम दर्जाची द्राक्षे तयार झाली आहेत. परिणामी बाजारपेठेत दर्जेदार द्राक्षांना मागणी निर्माण झाली आहे.
द्राक्षांना मिळणाऱ्या वाढत्या दराने मागील दोन वर्षांच्या अडचणींमधून सावरण्याची आशा द्राक्ष उत्पादकांमध्ये आहे. - अरुण शिंदे, संचालक द्राक्ष बागायतदार संघ, पुणे विभाग
अधिक वाचा: हिवाळ्यात नारंगी गाजर खावे की लाल? कोणत्या गाजराचे काय फायदे? जाणून घ्या सविस्तर
