योगेश गुंड
केडगाव : अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र बहुतांशी प्रमाणात घटले आहे. रानडुकरे आणि हरणांच्या उपद्रवामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात चारा टंचाई भेडसावत आहे. बाजारात हिरव्या चाऱ्याला मागणी वाढली आहे.
ग्रामीण भागात तर ज्वारी पेक्षा कडब्याला दुप्पट भाव मिळत आहे. चाराटंचाईमुळे यंदा कडब्याची पेंढी २५ रुपयांना विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.अनेक शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात.
अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर चालत आहे. तसेच शेतीसाठी बैलजोडी आवश्यक असते; परंतु गेल्या काही वर्षापासून जनावरांसाठी महत्त्वाचा चारा असलेल्या ज्वारीचा पेरा घटला आहे.
नगर तालुक्यात कांद्याचे क्षेत्र वाढल्याने यंदा ज्वारीच्या पेरणीत घट झाली आहे. काही ठिकाणी रानडुक्कर आणि हरणांच्या उपद्रवामुळे चाराटंचाईचे नवे संकट निर्माण झाले असून, सध्या उन्हाळा सुरू होताच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
कडबा ७ हजार रूपये टन
- यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्या गावातून चारा खरेदी करून आणत आहेत.
- एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्यातच आता चाराही महाग होऊन बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
- ऊसतोडणी यंत्राने झाल्याने वाढे नाहीत, त्यामुळे कडब्याला मागणी वाढली आहे.
२३०० रुपये ज्वारीला सरासरी दर
यंदा नगर बाजार समितीत ज्वारीला कमीत कमी २००० तर जास्तीत जास्त ३३०० रुपये भाव आहे. सरासरी भाव २ हजार ३५० रुपये क्विंटल असून रोजची आवक २०० ते ३०० क्विंटल होत आहे. यंदा मात्र नगर तालुक्यात ज्वारीचा पेरा घटला आहे.
चाऱ्याच्या भावात वाढ
मका - ३५०० रुपये टन
ऊस - ३२०० रुपये टन
कडबा - ७००० रुपये टन
ज्वारी-मका लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने ने यंदा चाराटंचाई भेडसावत आहे. बाजारात चाऱ्याला मागणी जास्त आणि आवक मात्र कमी आहे. यामुळे चाऱ्याचे भाव वाढले आहेत. - सागर औसरकर, चारा व्यापारी
अधिक वाचा: दुप्पट उत्पन्न देणाऱ्या शेळ्यांच्या 'या' तीन जाती निवडा अन् शेळीपालनात फायद्याच फायदा मिळवा