अजित साबळे
शिवथर : सध्या जगात इराण, अमेरिका या देशाच्या युद्धाचा थेट फटका भारतीय बाजारपेठेतील अनेक शेतकरी मालाला बसत आहे. सातारा जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
हळदीला सुद्धा याचा फटका बसला असून हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सरासरी १७ ते २० हजार रूपये क्विंटल असलेले दर तीन ते चार हजारांनी घसरले आहेत.
यामुळे शेतकरी वर्ग मात्र चिंतेत सापडला आहे. सध्याच्या चाललेल्या इराण व अमेरिका यांच्या युद्धामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
मालाचे दर पडले असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. शिवथरसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीचे पीक घेतले जाते.
काही वर्षांपासून हळदीचे दर निश्चिती पातळीवर गेल्यामुळे तसेच खताच्या किमती, मजूरी, मशागत, यासारख्या खर्चाने अनेक शेतकरी वर्गाने हळदीचे उत्पादन घेणे बंद केले होते.
परंतु यावर्षी हळदीच्या दराने १७ ते २० हजाराचा टप्पा गाठल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु सध्याच्या इराण व अमेरिकेच्या युद्धामुळे हळदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
सुमारे तीन ते चार हजार रुपयांनी हळदीचे दर घसरले असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
१७८८ हेक्टरवर उत्पादन
◼️ सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, कराड, जावळी तालुक्यातील वातावरण हळदीसाठी पोषक आहे.
◼️ त्यामुळे त्या परिसरातील शेतकरी हळदीचे उत्पादन घेत असतात.
◼️ यंदा सरासरी १,७८८ हेक्टरवर उत्पादन घेण्यात आले होते, अशी माहिती सातारा तालुका कृषी अधिकारी हृषिकेश राऊत यांनी दिली.
वातावरणाचा परिणाम तसेच खताच्या वाढत्या किमती व वाढलेली मजुरी, हळद पिकाला नसलेला दर यासारख्या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद पीक घेणे बंद केले होते परंतु यावर्षी चांगला दर असल्यामुळे शेतकरी आनंदित होता. परंतु युद्धाच्या पार्श्वभूमीवर पडलेले दर शेतकऱ्याला अडचणीत आणू शकतात. - युवराज साबळे, प्रगतशील शेतकरी, शिवथर, ता. सातारा
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
