कोल्हापूर : गुजरातबाजारपेठेत गुळाची मागणी वाढली असल्याने दर वाढले आहेत. दिवाळीपूर्वीच गुळाचा गोडवा वाढल्याने घाऊक बाजारात दर पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
पावसाने उघडीप दिल्याने गूळ हंगामाने गती घेतली असून, जिल्ह्यातील ९०हून अधिक गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. कोल्हापूर म्हटले की गुळाची बाजारपेठ अशी ओळख आहे.
जिल्ह्यात १००हून अधिक गुऱ्हाळघरे सुरू आहेत. यंदा, सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाने पाठ सोडली नसल्याने गुन्हाळघरांचा हंगाम अडचणीत आला होता.
मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने गुऱ्हाळघरांनी गती घेतली असून, सध्या ९०हून अधिक गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत.
कोल्हापूर बाजार समितीत दररोज सरासरी ३० किलोचे १२ हजार रवे, तर एक किलोचे ११,५०० बॉक्सची आवक होत आहे. गुजरात बाजारपेठेत गुळाला मागणी असल्याने येथे प्रतिक्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर आहे.
गेल्यावर्षी एप्रिल ते ११ ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर बाजार समितीत ६ लाख २५ हजार १९६ क्विंटलची आवक झाली होती. यावर्षी आतापर्यंत ८ लाख २ हजार ५८१ क्विंटल आवक झाली असून, तुलनेत १.७७ लाख क्विंटलने आवक वाढली आहे.
पावसाळ्यातही गुऱ्हाळघरे सुरू
यंदा मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबरपर्यंत एकसारखा बरसला. तरीही अखंड पावसाळ्यात नऊ गुऱ्हाळघरे सुरू राहिल्याने गुळाची आवक बाजार समितीत नियमित सुरू होती.
एक किलोच्या रव्यालाच अधिक पसंती
पूर्वी ३० किलो वजनाचे गूळ रवे यायचे, पण काळाच्या ओघात १०, ५ किलोपर्यंत आले. मात्र, आता एक किलोचे पॅकिंग आले आहे. ग्राहकांची मागणी वाढत असल्याने बाजार समितीत एक किलो गूळ रव्यांच्या बॉक्सची आवक वाढली आहे.
साखरेला तेजी; गुळाचाही भाव वधारला
गेले वर्षभर साखरेला तेजी आहे. घाऊक बाजारात ३२०० रुपये, तर किरकोळ बाजारात ४४०० रुपये क्विंटलपर्यंत दर राहिला आहे. त्याचा परिणाम गुळाच्या दरावरही झाला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच एक नंबर गुळाचा भाव पाच हजारापर्यंत पोहोचला आहे.
दिवाळीमुळे गुजरात बाजारपेठेत गुळाची मागणी चांगली असल्याने सध्या दर चांगले आहेत. आगामी काळात आवक वाढली तरी दरात फारशी तफावत होणार नाही. - अतुल शहा, गूळ व्यापारी, कोल्हापूर
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो उसतोडीची गडबड करु नका, अन्यथा कारखानदार भंगाराच्या दरात ऊस नेतील