किरण चौधरी
जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
गुणवत्तेनुसार केळीला प्रतिक्विंटल किमान १२०० रुपये तर कमाल १८०० रुपये असा दर मिळत आहे. मात्र, रमजानचा उत्तरार्ध आणि येणारा चैत्र नवरात्रोत्सव लक्षात घेता केळीची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्चमध्येच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. रात्री उशिराचा गारवाही कायम असल्याने त्यामुळे केळी मालाची आवक वाढली आहे. चिलिंगचा परिणाम न झालेल्या दर्जेदार केळीचे प्रमाण कमी आहे.
त्यातच रमजान महिन्याचा उत्तरार्ध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे मागणी काहीशी कमी झाली आहे. बाजारात खरबूज, टरबूज, द्राक्षे आणि आंबा या फळांची आवक वाढल्याने केळीच्या भावावर आणखी परिणाम होत आहे.
२२ फेब्रुवारीपासून केळीच्या भावात घसरण सुरू झाली. २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान भाव २२०० रुपयांवरून २००० रुपयांपर्यंत खाली आले. १ ते ७मार्चदरम्यान २००० ते १९०० रुपये दरम्यान झाले.
त्यानंतर ८ मार्चपासून पुन्हा ५० ते १०० रुपयांची घसरण झाली असून सध्या केळीचे भाव १६५० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिरावले आहेत.
जिल्ह्यातून केळीची निर्यात काहीशी कमी होत आहे. युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम फारसा जाणवत नाही. मात्र सोलापूर भागातून निर्यात होणारी केळी काही प्रमाणात देशांतर्गत बाजारातच वळत असल्याने अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.
परिणामी चिलिंग इंज्युरी झालेल्या केळीला सुमारे १२०० रुपये प्रतिक्विंटल तर दर्जेदार केळीला सुमारे १८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबल्याने केळीचे भाव २२०० रुपयांवरून खाली कोसळले आहेत. आज केळीभाव ११०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. - राहुल पाटील, चेअरमन, पीक संरक्षण सोसायटी, पिंप्राळा, ता. जळगाव.
आंध्र प्रदेशातून होणारी केळीची आवक, बाजारात वाढलेली रसाळ फळे, उन्हाचा तडाखा आणि गारव्यामुळे बाधित केळीमालाची वाढलेली आवक यामुळे भावात काहीशी घसरण झाली आहे. - किशोर गणवानी, केळी निर्यातदार, रावेर.
युद्धाचा थेट परिणाम फारसा नसला तरी सोलापूर भागातील निर्यात केळी देशांतर्गत बाजारात येत असल्याने फटका बसतो. - विशाल अग्रवाल, केळी निर्यातदार शेतकरी, अटवाडे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
