Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३ टन केळीच्या पिकअपचा दर अवघा सहा हजार; निर्यातक्षम केळी बागेतच चालली सडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:23 IST

सडलेल्या केळीच्या बागा काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना आता खर्च करावा लागणार आहे. करमाळा तालुक्याने केळी उत्पादनात राज्यात नाव कमविले.

करमाळा : युद्धाचा सर्वाधिक फटका करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

तालुक्यात उम्रड, कोळगाव, गौंडरे, चिखलठाण, वांगी कुगाव, सोगाव, वरकटणे, सरफडोह, निंभोर या गाव शिवारात तोडणीला आलेल्या तब्बल ५ हजार मेट्रिक टन केळीचे घड बागेतच झाडावर पिकून सडली आहेत.

युद्धामुळे संपूर्ण आखाती देशात अशांतता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी निर्यातदारांना माल पाठवू नका अशा सूचना दिल्या आहेत.

पूर्वीचे तब्बल २०० कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकल्याने फ्रूट निर्यातदार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना केळीची तोडणी व कापणी न करण्याच्या सूचना केल्याने तालुक्यात तोडणी लायक १० हजार मे. टन केळीपैकी ५ हजार मे.टन केळी बागेत सडली आहेत.

सडलेल्या केळीच्या बागा काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना आता खर्च करावा लागणार आहे. करमाळा तालुक्याने केळी उत्पादनात राज्यात नाव कमविले.

मात्र या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उसाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी केळीकडे वळाला होता. मात्र या परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान झाले आहे.

एक हजार मेट्रिक टन केळी शीतगृहाअभावी पडून◼️ एकट्या करमाळा तालुक्यात निर्यातक्षम एक हजार मेट्रिक टन केळी शीतगृहात भाव पडल्याने शिल्लक आहे.◼️ जोपर्यंत आखातात शांततेची परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत निर्यातदार व्यापाऱ्यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.◼️ तोडणीला आलेली केळी जवळपास २५ ते ३० दिवस टिकून राहतात. त्यानंतर ती केळी पिकण्यास सुरुवात होते.◼️ हे युद्ध लवकर थांबले नाही तर व्यापारी उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

भाव एक ते दीड रुपया किलो◼️ युद्धामुळे केळीची निर्यात थांबल्याने भाव कमालीचे पडलेले आहेत.◼️ उभ्या बागेत घडावर केळी सडायला लागल्याने अनेकांनी बागा ट्रॅक्टरने नांगरून मोडल्या आहेत.◼️ अनेकांनी केळी कापून जनावरांना चारा व शेतात खत म्हणून उपयोगात आणले आहेत.◼️ तोडणीला आलेल्या खोडवा केळीचा ३ टन वजनाचा पिकअप अवघ्या सहा हजार रुपयाला खरेदी केला जात आहे.

३ एकर केळीची बाग करण्यासाठी तब्बल ३ लाख ५० हजार रुपये खर्च आला, पण दुर्दैवाने आखातात युद्ध सुरू झाल्याने निर्यात बंद झाल्याने संपूर्ण केळी बागेत घडावर सडलेली आहे. संपूर्ण बागेत सडलेल्या केळींचा वास येत आहे. सडलेली केळी आता जनावरेही खाणार नाहीत. सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. - योगेश कोंडलकर केळी उत्पादक, उम्रड, (ता. करमाळा)

अधिक वाचा: राज्यात 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप पीक विम्याचे पैसे मिळणार; शासन निर्णय जारी

English
हिंदी सारांश
Web Title : Banana farmers face huge losses as exports halt due to war.

Web Summary : Karama banana farmers suffer massive losses as war halts exports. Thousands of tons of bananas rot in gardens, prices crash. Farmers face financial ruin.
टॅग्स :केळीशेतकरीशेतीसोलापूरयुद्धबाजारमार्केट यार्डकाढणी