शहापूर : बाजारात साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळूनही आणखी वाढ होईल, या अपेक्षेने तुरीची विक्री रोखून धरलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसला आहे.
गेल्या महिनाभरात तुरीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत राहिले, मात्र सध्या दरात सुमारे ६५० ते ७५० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
बाजारातील अनिश्चितता, आयात-निर्यात धोरणातील बदल आणि आवक वाढ यांचा एकत्रित परिणाम तुरीच्या दरावर होत आहे.
बाजारातील अनिश्चिततेचा फटका
◼️ देशांतर्गत आवक वाढणे, केंद्र सरकारकडून आयात धोरणातील सवलती, तसेच मोठ्या व्यापाऱ्यांची सावध खरेदी धोरणे यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
◼️ दरातील चढ-उतारामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने विक्री रोखली
◼️ जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुरीला ८,३०० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. आगामी काळात दर ९ हजारांच्या पुढे जातील, अशी चर्चा होती.
◼️ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल गोदामात साठवून ठेवत विक्री थांबविली; परंतु अपेक्षित वाढ न झाल्याने आता साठविलेला माल कमी दरात विकण्याची वेळ आली आहे.
क्विंटलमागे ७०० रुपयांचा तोटा
◼️ सध्या बाजारात तुरीचा दर ७,७०० ते ७,८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे.
◼️ महिनाभरापूर्वी मिळणाऱ्या दराच्या तुलनेत सरासरी ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
◼️ वाहतूक, साठवण आणि व्याज खर्च यामुळे प्रत्यक्ष नुकसान आणखी वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
आठवडाभरातील तुरीचे दर
◼️ स्थानिक : ८,५०० - ८,२०० - ७,८००
◼️ लाल : ८,४०० - ८,१०० - ७,७५०
◼️ पिवळी : ८,३०० - ८,०५० - ७,७००
तुरीच्या भावात सातत्याने बदल का होतात?
◼️ उत्पादनाचा अंदाज आणि प्रत्यक्ष आवक यात फरक.
◼️ आयात निर्णय व साठा धोरण.
◼️ बाजार समित्यांमधील लिलावातील स्पर्धा.
◼️ हवामानाचा परिणाम व साठवण क्षमता.
◼️ सट्टेबाजीची मानसिकता.
◼️ महिनाभरात बदलत गेला भाव.
भाव वाढणार की आणखी पडणार?
◼️ तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारात आवक कायम असल्याने दरात मोठी वाढ तातडीने अपेक्षित नाही.
◼️ मात्र, सरकारी खरेदी किंवा निर्यात धोरणात बदल झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते.
◼️ आगामी दोन आठवडे निर्णायक ठरणार असल्याचे व्यापारी सांगतात.
बाजारात सध्या मालाची आवक वाढली आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. - रामशेठ अग्रवाल, व्यापारी
दर आणखी वाढतील, या आशेने माल रोखून धरला; पण आता ७०० रुपयांनी दर घसरल्याने नुकसान झाले. साठवण खर्च वेगळा. - दीपक बैनाडे, शेतकरी
दरातील चढ-उतारामुळे नियोजन करणे कठीण झाले आहे. सरकारने किमान हमीभावावर प्रभावी खरेदी करावी. - सखाराम गावीत, शेतकरी
अधिक वाचा: जमिनीला आलाय सोन्याचा भाव; शेतजमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा का वाढतोय कल? वाचा सविस्तर
