दरवर्षी दीपावलीपूर्वी सुरू होणारा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम यावर्षी पावसाने दीर्घकाळ हजेरी लावल्याने उशिरा सुरू झाला आहे. यावर्षी निफाडच्या गोदाकाठ भागात सर्वात अगोदर अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यासह निफाड तालुक्यातील केजीएस साखर कारखाना, अंतापूर-ताहाराबादचा द्वारकाधीश सहकारी साखर कारखाना, दिंडोरी तालुक्यातील कादवा तसेच संगमनेर, कोळपेवाडी आदी कारखान्यांचे ऊसतोड मजूर सहकुटुंब दाखल झाले आहेत.
त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील दोन साखर कारखाने बंद असल्याने तालुक्यातील विशेषतः गोदाकाठ पट्टयातील ऊस आपल्याच कारखान्याला मिळावा, यासाठी शेजारच्या तालुक्यांतील, जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची स्पर्धा सुरू असते.
हा ऊस मिळावा यासाठी हे कारखाने याच परिसरातील तरुणांना हाताशी धरून प्रतिटनामागे कमिशन देऊन या तरुणांच्या मदतीने उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस आपल्या कारखान्याला मिळावा, यासाठी प्रयत्न करीत असतात.
तालुक्यातील निफाड, जळगाव, काथरगाव, कुरुडगाव, सुंदरपूर, सायखेडा, चांदोरी, कोठुरे, शिंगवे, गोदानगर, चापडगाव, मांजरगाव, म्हाळसाकोरे, खाणगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी, सारोळेधडी, शिवरे, चाटोरी, वन्हेदारणा, लालपाडी, चितेगाव फाटा, गोंडेगाव, शिंपीटाकळी, सोनगाव, नांदूर मधमेश्वर, दिंडोरी तास, खेडलेझुंगे, कोळगाव, करंजी खुर्दसह परिसरातील गावांच्या कडेला शेतात या ऊसतोड मजुरांनी आपला डेरा टाकला आहे.
कुणी बैलगाडीने, तर कुणी ट्रकमधून मुलाबाळांसह आले आहेत. या मजुरांनी उसाचे पाचट व प्लॅस्टिक बारदान वापरून झोपड्या उभ्या करून त्यात आपला संसार थाटला आहे. या ऊसतोड मजुरांबरोबरच कारखान्यांचे अधिकारी व कर्मचारीदेखील दाखल झाले आहेत.
अनेक ठिकाणांहून आगमन
यावर्षी कन्नड, मालेगाव, चाळीसगाव, नांदगाव, येवला तालुक्यातील मजूर बैलगाडीने, तर काही मजूर ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरसह मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या मजुरांचे गोदाकाठ भागात आगमन झाले आहे.
आठवडे बाजारही गजबजला
• ऊसतोड कामगार दाखल झाल्यापासून किराणा दुकानदार, भाजीपाला, हॉटेल व्यावसायिक, कापड दुकानदार, पाणी टपरी, कटलरी, मोबाइल दुकानदार, इलेक्ट्रिक साहित्य, खाद्यपदार्थ तसेच इतर किरकोळ व्यावसायिकांसह गोदाकाठ भागातील आठवडे बाजार गजबजले आहेत.
• व्यापाऱ्यांचे चलन वाढलेले दिसून येत आहे. कारण सर्वच कामगार हे हातावर पोट असणारे असतात. त्यामुळे आठवडे बाजार तसेच जवळच्या किराणा दुकानातून ते खरेदी करीत असल्याने या दुकानदारांचा व्यवसाय होतो.
