बारामती : चालू चिंच हंगामाला प्रारंभ झाला असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चिंच लिलावाचा प्रारंभ शनिवारी (दि. १४) सुपे उपबाजार येथे होणार आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजारातील चिंच लिलाव राज्यात प्रसिद्ध आहे. या वर्षी चिंचेसाठी वातावरण पोषक असल्यामुळे आवक चांगली होईल, अशी अपेक्षा आहे.
तरी शेतकऱ्यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवून पॅकिंगमध्ये आणावी, असे आवाहन सभापती विनायक गावडे, उपसभापती अरुण सकट यांनी केले आहे.
सुपे उपबाजार आवारात गतवर्षी एकूण ३८,००० पोत्यांची चिंचेची आवक झाली होती आणि चिंचेस प्रतिक्विंटल रु. ७,००० असा उच्चांकी दर मिळाला होता. तर किमान दर रु. २५०० होता.
फोडलेल्या चिंचेस प्रतिक्विंटल कमाल दर रु. १३,००० आणि सरासरी दर प्रतिक्विंटल रु. १०,००० मिळाला होता. बारामती तालुक्यातील तसेच शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापूर, भोर तालुक्यांतून चिंचा विक्रीसाठी येत असतात.
सुपे उपबाजारात चिंचेचे लिलाव दर शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होतील. शेतमालाचे वजनमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर लिलावापूर्वी होत असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर
