कोल्हापूर : ऐन संक्रांतीत गूळ वधारला असला तरी साखरेच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून घाऊक बाजारात साखरेचे दर कमी झाले असून प्रतिक्विंटल २५० रु.नी दर खाली आल्याने साखर कारखान्यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरापासून साखरेला चांगला भाव मिळत होता. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३८०० ते ३९०० रुपयांपर्यंत दर पोहोचला होता. पण, गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून साखरेचे दर उतरले आहेत.
राज्यातील साखर साखर कारखान्यांच्या विक्रीच्या टेंडरना मिळालेला दर पाहता प्रतिक्विंटल ३५४० ते ३८६० रुपये दर मिळाला आहे. मागील महिन्यापेक्षा साखर दरात प्रतिक्विंटल २५० रु.ची घसरण झाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.
याउलट किरकोळ बाजारात गुळाचे दर प्रतिक्विंटल २ ते ३ रुपयांनी वधारले. बाजार समितीत रोज सरासरी १५ हजार गूळ रव्यांची आवक होते. घाऊक बाजारात एक नंबर प्रतीचा गूळ प्रतिक्विंटल ४७५० रुपयांपर्यंत दर आहे.
येथे किमान दर प्रतिक्विंटल ४२५० रुपयांपर्यंत आहे. साखर दरात घसरण सुरू झाल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. हंगाम निम्म्यावर आला असताना दरात घसरण झाल्याने अडचणी वाढणार आहेत.
बाजारातील साखरेचे प्रतिक्विंटल दर
| प्रकार | एस | एसएस | एम |
|---|---|---|---|
| किमान | ३,५४० | ३,५६१ | ३,६५६ |
| कमाल | ३,७५० | ३,७६० | ३,८६० |
गुळाचे घाऊक बाजारातील दर (प्रतिक्विंटलमध्ये)
१ नंबर - ४,७५०
२ नंबर - ४,६००
३ नंबर - ४,२५०
किरकोळ बाजारात दर स्थिर
घाऊक बाजारात साखरेचे दर घसरले असले तरी किरकोळ बाजारात दर स्थिरच राहिले आहेत. सध्या प्रतिकिलो ४२ ते ४४ रुपयांपर्यंत दर असून दर घसरल्याचा फायदा थेट ग्राहकांना कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिक वाचा: साखर उताऱ्यात सहकारी कारखाने पुढे; कोणत्या कारखान्याने केले किती ऊस गाळप?
