मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीपेक्षाही अधिक दर मिळत आहे. शनिवारी प्रतिक्विंटल ५५०० ते ५९०० रुपये दर मिळाला.
सातत्याने दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरविली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच सोयाबीनला अपेक्षित दरही मिळत नव्हता.
यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले होते. सध्याच्या काळात सोयाबीनचे उत्पादन कमी असूनही डिसेंबर २०२५ मध्ये सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता.
डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात 'नाफेड'च्या केंद्रांवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू झाली. दरम्यान, मागील १५ दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आहे.
मागील चार दिवसांत तर हमीभावापेक्षाही (५३२८ रुपये) अधिक दर सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मंगळवारी सांगली मार्केट यार्डात सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५०० ते पाच हजार ९०० रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
